कोलकाता: दोन दिवसापुर्वी झारखंडमध्ये काही तरुणांनी मुस्लीम युवकाला ‘जय श्रीराम’ बोलण्यावरून मारहाण केली होती. हे प्रकरण शांत होत नाही आज पुन्हा कोलकाता पार्क स्टेशनवर मदरसा शिक्षकाला चालत्या ट्रेन मधून ढकलून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हाफीज मोहम्मद शाहरूक हलदर असे शिक्षकाचे नाव आहे. सुदैवाने त्याच्या जीविताला कोणतीही हानी झाली नाही.
मदरसा शिक्षक हाफीज मोहम्मद शाहरूक हलदर कामानिमित्त कोलकात्याला आला होता. लोकलने तो प्रवास करत होता. ट्रेन हुगळी परिसरातून जात असताना जमावाने त्याला ‘जय श्री राम’ म्हणण्याची सूचना केली. २० वर्षीय हलदरने जय श्री राम म्हणण्यास नकार दिला. यामुळे ट्रेनमधील जमावाने त्याला जबर मारहाण केली. पार्क सर्कल स्टेशनजवळ येताच चालत्या ट्रेनमधून त्याला बाहेर ढकलण्यात आलं. हलदर प्लॅटफॉर्मवर आपटला आणि गंभीर जखमी झाला. हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनीच हलदरला मारहाण केल्याचा आरोप केला जातो आहे.
हलदरला चालत्या ट्रेनमधून खाली फेकल्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. अशी कोणतीच घटना घडली नसल्याचे हिंदू संहती या संघटनेने म्हटले आहे. लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या हिंदू संहतीच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी हिंदू संहतीने तक्रार दाखल केली आहे. पोलीस या दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत.