प्लॅन स्पर्धेत अमरावती, बिझनेस सातारा प्रथम : ‘फाली-२०१९’ च्या पहिल्या सत्राचा समारोप
जळगाव दि. २५ (प्रतिनिधी) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व ‘अॅक्शन प्लॅटफार्म’तर्फे आयोजीत भारताच्या कृषिक्षेत्रातील भविष्यदर्शी नायकांच्या ‘फाली-२०१९’ पाचव्या संमेलनाच्या पहिल्या सत्राचा आज समारोप झाला. यात इनोव्हेशन स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील शिवाजी मल्टीर्पज उच्च माध्यमिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्मार्ट इरिगेशन सिस्टिम यंत्र प्रथम ठरले. तसेच बिझनेस प्लास स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील मोल येथील गुरूवर्य गणपतराव कालंगे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बीटरूट प्रॉडक्शनने प्रथम क्रमांक पटकाविला. ‘फाली-२०१९’ या संमेलनासाठी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील एकूण १०० शाळांच्या ८००० विद्यार्थ्यांपैकी ८००विद्यार्थ्याची निवड करण्यात आली. यापैकी प्रथम गटाच्या विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले.
जैन हिल्स आवारातील आकाश मैदानावर झालेल्या ‘फाली संमेलन-२०१९’च्या पहिल्या टप्प्याच्या समारोपाप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अॅक्शन प्लॅटफार्मच्या समन्वयिका नॅन्सी बेरी, जैन फार्मफ्रेश फूडसचे संचालक अथांग जैन, कार्यकारी संचालक सुनील देशपांडे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी डॉ. दिलीप कुलकर्णी, डॉ. अनिल ढाके, गोदरेज एग्रोवेटचे प्रमोद प्रसाद, अंकुर वेरमाणी, युपीएलचे समीर म्हैसकर, वैभव गुंढे, नथा दुडीया, जतीन पटेल, बायर क्रॉप सायन्सचे जिंतेंद्र गावंडे, फाल्गुन शहा, स्टार ग्रीचेहरिष रावत, अभिषेक प्रधान, विपीन सिंघल उपस्थीत होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पहिल्या टप्प्याच्या विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना ‘फाली-२०१९’ टी शर्ट आणि कॅपचे वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांशी अशोक जैन यांनी सुसंवाद साधला. ते म्हणाले की, ‘फाली’च्या माध्यमातून संपूर्ण देशभरात कृषी क्षेत्रात एक क्रांतीकारी पाऊल उचलले जात आहे. कृषी आणि कृषीपुरक उद्योग आता महत्वपूर्ण क्षेत्र म्हणुन पुढे येत आहे. कृषी क्षेत्राच्या विकासाला व्यवसायांच्या नव्या योजना आणि नवकल्पनांवर आधारलेल्या नव्या प्रयोगांना फाली मधील विद्यार्थ्यांची प्रतिभा पाहुन भविष्यातील कृषिक्षेत्राच्या वृद्धीचे सक्षम नेतृत्व घडत आहे. फालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी बिझनेस प्लॅन आणि इनोव्हेशेन स्पर्धेत सादरीकरण केले. हे सादरीकरण कृषी क्षेत्रात येणार्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी प्रभावी माध्यमच म्हणावे लागेल. असे सांगून त्यांनी डॉ. भवरलालजी जैन यांनी लहानश्या रकमेतून उभारलेल्या उद्योगाच्या विस्ताराची कहाणी विद्यार्थ्यांना सांगितली. फालीचे व्यवस्थापक हर्ष नौटियाल यांनी सूत्रसंचालन केले. रोहीणी घाडगे, सचिन पवार, प्रदीप गरकड यांनी सहकार्य केले.
फाली इनोव्हेशन स्पर्धेतील विजेते
फाली-२०१९ अंतर्गत घेतलेल्या पहिल्या टप्प्याच्या इनोव्हेशन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात बहुउद्देशीय शेती यंत्र, ऊस लागवड यंत्र, नारळ फोडण्याचे यंत्र, कीड नियंत्रणासाठी चिकट सापळा यंत्र, लाईट असलेले फिरते सापळा यंत्र, यासह अनेक इनोव्हेटीव्ह उपकरणे विद्यार्थ्यांनी सादर केली. या स्पर्धेतील विजेते असे, प्रथम : श्री शिवाजी मल्टीर्पपज उच्च माध्यमिक स्कूल (अमरावती), व्दितीय : खान्देश गांधी बालूभाई मेहता विद्यालय (कासरे), तृतीय : स्वामी प्रणवानंद सरस्वती हायस्कूल (कालीमठ), चतुर्थ पिंपळगाव हायस्कूल(पिंपळगाव बसवंत, नाशिक), तर पाचवा क्रमांक श्रीमती राधाबाई शिंदे हायस्कूल (हस्ता).
बिझनेस प्लॅन स्पर्धेतील विजेते
या उपक्रमात बिझनेस प्लॅन स्पर्धा घेण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण बिझनेस प्लॅन सादर केले. यात पेरूच्यापानांपासून ग्रीन-टी तयार करणे, गीर गायींचे संगोपन आणि कुक्कटपालन, सेंद्रीय खत निर्मिती, गांडूळ खत निर्मिती, धुपकांडी निर्मिती, दशपर्णी अर्कपर्णी, चॉकलेट निर्मिती, फाली विटा एनर्जी ड्रिंक उत्पादन, बेल वाईन उत्पादन, पर्ल निर्मिती उत्पादन, शुगर बिट निर्मितीयासह वेगवेगळे बिझनेस प्लॅन सादर केले. या स्पर्धेतील विजेते असे प्रथम : गुरूवर्य गणपतराव कालंगे विद्यालय, (मोल, सातारा), व्दितीय : गुरूदयाल सिंग राठोड आश्रम स्कूल (गरदा, औरंगाबाद), तृतीय : ज्ञानसागर निवासी स्कूल (अष्टी, यवतमाळ), चतुर्थ : महात्मा गांधी विद्यालय (कर्जत, अहमदनगर) तर पाचवा क्रमांक हिरकणी विद्यालय गावडेवाडी (पुणे).
अजिंक्य, सोहमच्या यंत्राचा गौरव
गेल्यावर्षी झालेल्या फाली संमेलनात नाविन्यपूर्ण संशोधन अहमदनगरच्या अजिंक्य गोसावी आणि सोहम पाटील या विद्यार्थ्यांनी मांडले होते. त्यांनी लहान शेतकर्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार्या पीक कापणी यंत्राची निर्मिती केली होती. फाली संमेलनात त्यांना पहिल्या भागात क्रमांक एकचे पारितोषीक मिळाले होते. ही कापणी यंत्र प्रत्येकी आठ हजार रुपयांना एक याप्रमाणे चार यंत्रांची ऑर्डर जैन इरिगेशनने त्यांना दिली होती. यावेळी अजिंक्यने व्यासपीठावर येऊन पिक कटर यंत्राचे आता सादरीकरण केले.