आश्रमशाळांचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे आदेश

0

जळगाव – जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेल्या आश्रमशाळा, अपुर्णावस्थेतील शाळा आणि नव्याने शाळा बांधण्यासाठी आवश्यक असलेला मास्टर प्लॅन तयार करण्याचे आदेश आदीवासी प्रकल्प विभागाला देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
आदीवासी विकास प्रकल्प विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीला संबंधित विभागाच्या अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या परिस्थीतीबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले. जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न असुन काही ठिकाणी नविन जागा घेऊन शाळांची उभारणी करावयाची आहे. त्यासाठी मास्टर प्लॅन सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यात ८ हजार विद्यार्थ्यांची पटसंख्या मंजूर असतांना ५००० विद्यार्थी आहेत. शासनाने जिल्ह्यातील २७०० विद्यार्थ्यांना निवासी इंग्लिश मिडीअमच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊन दिला आहे. आश्रमशाळांबाबत काही संकल्पना असुन आधी सुचना देऊन मग त्यावर काम केले जाणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.