जळगाव विमानतळावरून १७ जुलैपासून पुन्हा उड्डाण

0

ट्रुजेट कंपनीच्या पुढाकाराने विमानसेवा सुरू होणार

जळगाव – हैदराबाद येथील ट्रूबो मेगा एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड अर्थात ट्रूजेट कंपनीतर्फे १७ जूलैपासून विमानसेवा सुरू करीत असल्याची माहिती कंपनीचे सेल्स मॅनेजर निषीत भट्ट यांनी आज येथे दिली. येथील रॉयल पॅलेसमध्ये आज सायंकाळी शहरातील अनेक उदयोजक, व्यापारी, डॉक्टर, प्रतिष्ठीतांची बैठक घेण्यात आली त्यात त्यांनी ही माहिती दिली.
उडान योजनेंतर्गत सुरू झालेली जळगाव ते मुंबई विमानसेवा ही स्लॉटच्या कारणामुळे बंद पडली होती. ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी विमानतळ समिती नेमण्यात आली होती. समितीच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर दि. १७ जुलैपासून जळगाव विमानतळावरून पुन्हा विमानसेवा सुरू होणार आहे. आज शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस येथे ट्रुजेट कंपनीचे अधिकारी यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी जळगाव विमान सेवा सल्लागार समितीचे सदस्य भरत अमळकर, उद्योजक प्रेम कोगटा, उद्योजक नंदूशेठ अडवाणी, सचिन चोरडीया, विनोद बियाणी, पुरूषोत्तम टॉवरी, दिलीप गांधी, पालकमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख आदी उपस्थित होते. ट्रुजेट कंपनीचे विमान सध्या ७२ आसनी असेल. यामुळे जळगाव ते मुंबई जाणार्‍या व्यापारी, उद्योजकांची सोय होणार आहे. श्री.भट्ट यांनी कंपनीविषयी माहिती दिली. अहमदाबाद तेथे जळगाव, मुंबई, कोल्हापूर अशा ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात येत आहे. साधारणतः पहिल्या ३६ प्रवाशांसाठी १५०० ते २००० असे भाडे असेल. नंतरच्या प्रवाशांसाठी जादा भाडे असेल. कंपनीने विमान सेवा सुरू करण्याबाबतच्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत. फक्त ‘डीजीसीए’ची परवानगी बाकी आहे. यावेळी उद्योजक, व्यापार्‍यांनी विमानसेवेला प्रतिसाद देवू मात्र विमानसेवा नियमित सूरू राहिली पाहिजे. मध्येच बंद नको पडली पाहिजे. एकदा बुक केले की विमानसेवा रद्द नको व्हायला आदी मागण्या केल्या. त्याला श्री.भट्ट यांनी उत्तरे देत विमान सेवा अखंडीतपणे सुरू राहीलच असे सांगितले.

सव्वातासात जळगाव ते अहमदाबाद
दि. १७ जूलैपासून विमान सेवा सुरू होईल.
सोमवारी अहमदाबाद वरून विमान सकाळी पावणे दहाला निघेल. जळगावला अकराला पोचेल. वीस मिनीटांचा ब्रेक घेवून परत ११.२० विमान जळगाववरून निघेल. १२.३५ ला अहमदाबादला पोचेल. सव्वातासात विमान जळगावहून अहमदाबादला पोचेल.

अशी राहील सेवा
मंगळवार, बुधवार, गुरूवार ः हे तीन दिवस अहमदाबाद ते जळगाव, जळगाव ते मुंबई, मुंबई ते जळगाव, जळगाव ते अहमदाबाद अशी विमान सेवा असेल.
शुक्रवार, शनिवार, रविवार ः हे तीन दिवस अहमदाबाद ते जळगाव, जळगाव ते मुंबई, मुंबई ते कोल्हापूर, कोल्हापूर ते मुंबई, मुंबई ते जळगाव, जळगाव ते अहमदाबाद अशी सेवा असेल. अहमदाबादवरून सकाळी पावणे दहाला विमान निघेल.