सहकार विभागाचे दुर्लक्ष : अधिकार्यांचे कानावर हात
जळगाव – जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची भिंत तोडल्यानंतर व्यापार्यांनी विद्यमान सत्ताधार्यांवर मोठे खळबळजनक आरोप केले आहे. त्यात या प्रस्तावित व्यापारी संकुलाच्या गाळे विक्रीतुन ३० कोटी रूपये पुढार्यांना मिळणार असल्याचा एक आरोप आहे. आता या ३० कोटी रूपयांचे लाभार्थी ‘पुढारी’ कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान बाजार समितीच्या आवारातील तोडलेल्या भिंतीचे प्रकरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची संरक्षक भिंत काल दि. ८ रोजी जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर व्यापार्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. या असंतोषातुन अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली. व्यापार्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता ही भिंत तोडण्यात आली. सभापती पदावर नुकतेच विराजमान झाल्यानंतर कैलास चौधरी यांनी कुठल्याही प्रकारची बैठक किंवा ठराव न करता ही कार्यवाही पुर्ण केल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे. तसेच ज्यावेळी याठिकाणी प्रस्तावित व्यापारी संकुलाचा मुद्दा समोर आला त्या-त्यावेळी संचालक मंडळावरील व्यापार्यांच्या प्रतिनीधींनी या विषयाला विरोध केला आहे. संरक्षक भिंत पाडल्याच्या निषेधार्थ व्यापार्यांनी उद्या दि. १० पासून कृषी उत्पन्न बाजार समितीत बेमुदत बंद पुकारला आहे.
व्यापार्यांच्या आरोपांची चौकशी व्हावी
बाजार समितीतील प्रस्तावित व्यापारी संकुलाचा ठेका हा बीओटी तत्वावर पराग कन्स्ट्रक्शनला देण्यात आला आहे. मात्र पराग कन्स्ट्रक्शन हे केवळ नामधारी असुन खटोड बंधुंचा यात मोठा सहभाग असल्याचा आरोप आडत असोसिएशनने केला आहे. तसेच या संकुलाच्या माध्यमातुन पुढार्यांना तब्बल ३० कोटी रूपये मिळणार असुन या ३० कोटीचे भागीदार कोण? याचा शोध सुरू झाला आहे. दरम्यान व्यापार्यांनी केलेल्या या आरोपाची चौकशी व्हावी जेणेकरून हे व्हाईट कॉलर पुढारी समोर येतील अशी मागणी होत आहे.
सहकार विभागाचे कानावर हात
बाजार समिती ही शासकीय मालमत्ता आहे. त्यामुळे त्यात बदल करण्यापुर्वी संस्थेच्या संचालक मंडळासह संबंधित विभागाची परवानगी घ्यावी लागते. मात्र काल भिंत पाडण्यात आल्यानंतर तशी कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड आणि बाजार समितीचे सचिव रमेश माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देण्यास चक्क कानावर हात ठेवले. त्यामुळे या अर्थकारणाकडे अधिकारी देखिल सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.
बाजार समितीच्या मालमत्तेच्या नुकसानीला जबाबदार कोण ?
ना बैठक, ना परवानगी घेता बाजार समितीची संरक्षक भिंत तोडुन संस्थेचे एकप्रकारे नुकसानच करण्यात आले आहे. या नुकसानीला जबाबदार कोण? संबंधितांवर गुन्हा दाखल होईल का? असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित केला जात आहे.
व्हाईट कॉलर बांधकाम व्यावसायिकांची टोळी सक्रिय
शहरात गेल्या तीन ते चार वर्षापासून व्हाईट कॉलर बांधकाम व्यावसायिकांची टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीमार्फत शहरातील शासकीय जमिनींमध्ये फेरबदल करून त्यांचा व्यावसायिक वापर करून बख्खळ पैसा कमविण्याचा फंडा सुरू आहे. मात्र अशा काही बांधकाम व्यावसायिकांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्याविरूध्द साधे बोलायला देखिल कुणीही धजावत असेच चित्र आहे.
प्रकरणाची माहिती घेणार
कृषी उत्पन्न बाजार समितीची भिंत पाडली गेली याबाबत आपल्याला कुठलीही माहिती नाही. तरी या प्रकरणाची माहिती घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल
मेघराज राठोड जिल्हा उपनिबंधक
उच्च न्यायालयाचा अवमान
सर्व्हिस रोड, व त्यासाठीची कृषी उत्पन्न बाजार समितीची भिंत हे प्रकरण उच्च न्यायालया न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत ही भिंत पाडायला नको होती, भिंत पाडण्याआधी व्यापारी, संचालकांची कुठलीही बैठक न घेता रातोरात भिंत पाडणे म्हणजे हा उच्च न्यायालयाचा अवमान आहे. न्यायालयात भिंत पाडण्याच्या विषयावर सर्वच पध्दतीने बाजू मांडण्यात आल्या आहेत. शशीकांत बियाणी, व्यापारी
नियमबाह्य प्रकार, विकासाला विरोध नाही
गेल्या ४० वर्षापासून कृषि उत्पन्न बाजार समितीची संरक्षण भिंत आहे. भिंत पाडल्याने मार्केट पूर्ण उघडे पडले असून चोरीचा प्रकार वाढून शेतकर्यांसह, व्यापार्यांचा लाखोच्या मालाच्या नुकसानीची शक्यता आहे. विकासाला विरोध नाही. शासनाच्या नियमानुसार ही भिंत पाडली असती तर त्याला विरोध नव्हता, मात्र नियमबाह्य पध्दतीने हे काम होत असल्याने त्याला व्यापार्याचा विरोध आहे. भिंत पाडण्याआधी व्यापार्यांना कल्पना देणे गरजेचे होते. जेणेकरुन मालाच्या संरक्षणाबाबत उपापयोजना केली असती, मात्र तडकाफडकी भिंत पाडणे हा प्रकार चुकीचा आहे. अशोक लाठी, व्यापारीलाखो रुपयांची उधळपट्टी कशासाठी?
कृऊबा समितीसह व्यापार्यांचा कायदेशीर लढा सुरु आहे. भिंत पाडण्याआधी पत्र्याचे शेड, पर्यायी भिंत अशाप्रकारे उपाययोजना केली जाणे अपेक्षित होत मात्र तसे झाले नाही. महिनाभरापूर्वीची संरक्षण भिंतीची रंगरंगोटी करण्यात आली, वृक्ष लागवड , पेव्हर ब्लॉक, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी अशी सुविधा करण्यात आली. कोणताही विचार न करता काही तासातच ती जमीनदोस्त करण्यात आली. भिंत पाडायचीच होती तर अशाप्रकारचे पैशांची उधळपट्टी कशासाठी? कृऊबा शेतकरी हित जोपासणे अपेक्षित आहे, यात संकुलातून कुठल्याप्रकारे शेतकरी हित कुठे जोपासले जात आहे, हा प्रश्न आहे. –प्रविण पगारीया, उपाध्यक्ष व्यापारी महामंडळ
सत्ताधार्यांंना सत्तेची मस्ती
कृषि उत्पन्न बाजार समिती तसेच संचालकांकडून शेतकरी हित जोपासणे गरजेचे आहे. मात्र शेतकरी न जोपासता भिंत पाडून त्याठिकाणी व्यापारी संकुल बनवून संचालक, पुढारी तसेच नेत्यांचे आर्थिक हित जोपासले जात आहे. भिंत पाडण्यामागे वेगळाच हेतू असून बोलविता धनी वेगळा आहे. भिंत पाडून संकुल बनविण्याचा ज्या बिल्डरांना ठेका आहे आहे दोघेही बड्या भाजप नेत्यांचे पार्टनर आहेत. सत्ताधार्यांना सत्तेची मस्ती चढली असून जनतेचा कुठलाही विचार न करता नियमबाह्यपध्दतीने कामे केली जात आहेत. –विजय काबरा, अध्यक्ष व्यापारी महामंडळ