कैद्यांचे भांडण सोडविण्यास गेलेल्या तुरूंगअधिकार्‍यांवर हल्ला

0

जिल्हा कारागृहातील घटना ; हातावर केले लोखंडी पट्टीने वार ; कैद्याकडून दुसर्‍या कैद्याला केली जात होती पैशांची मागणी

जळगाव- प्राणघातक हल्लयाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कारागृहातील दोन कैद्यांचे भांडण सोडविण्यास गेलेले तुरुंग अधिकारी किरण संतोष पवार यांच्यावर भांडण करणार्‍यांमधील सचिन दशरथ सैंदाणे वय 30 या कैद्याने लोखंडी पट्टीने वार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहात घडली. या घटनेत तुरुंगअधिकारी पवार यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनरंतर कैदी सचिन सैंदाणे याने स्वतःचे डोके फोडून घेतले. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न झाले, मात्र त्याने नकार दिल्याचे कारागृहप्रशासनाकडून सांगण्यात आले. सचिनने स्वतः डोके फोडले नसून अधिकार्‍यांनी त्यालाच मारहाण केली व रुग्णालयातही नेले नाही, अशी कारागृहाबाहेर चर्चा होती.

पैशांच्या मागणीनुसार कैद्यांमध्ये भांडण
शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल प्राणघातक तसेच आर्म अ‍ॅक्टच्या गुन्ह्यात सचिन दशरथ सैंदाणे वय 30 हा न्यायालयीन कोठडीत असून 3 ऑक्टोंबर 2016 पासून तो कारागृहात आहे. तर महेश उर्फ डेम्या वासुदेव पाटील वय 20 हा तालुका पोलीस ठाण्यात दाखल प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असून पाच दिवसांपूर्वीच तो कारागृहात आला आहे. सचिन हा गेल्या काही दिवसांपासून कुठलेही कारण नसतांना महेशला 5 हजार रुपयांची मागणी करत होता. मात्र महेशने त्याला नकार दिला. मात्र सचिनने महेशला पैशांसाठी तगादा लावून ठेवला. त्यावरुन त्यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली.

दोघांनी पकडून ठेवत एकाने केली मारहाण
सचिनने पुन्हा सोमवारी रात्री 8.30 वाजता महेशला पैशांची मागणी केली. महेशने विरोध करताच सचिनने वाद घातला. कारागृहातील कर्मचार्‍यांना महेशचा आरडाओरड करण्याचा आवाज जावू नये म्हणून याच बॅरेकमधील इच्छाराम पुंडलिक वाघोदे व अजय डिंगंबर जाधव या कैद्यांनी सचिनच्या सांगण्यावरुन महेशचे हातपाय धरुन ठेवले तसेच त्याचे तोंड दाबून सचिनने महेशला दमदाटी केली. पैसे दिले नाही तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली.

तुरुंग अधिकार्‍यावर वार, रक्षकाचा झटापटीत पाय मुरगळला
मंगळवारी सकाळी 9.30 वाजता पैशांवरुन सचिन व महेशमध्ये वाद सुरु झाला. मोठ्या मोठ्याने आरडाओरड करण्याचा आवाज एैकून कर्तव्यावरील तुरुंगअधिकारी किरण संतोष पवार यांनी भांडण सुरु असलेल्या बॅरेककडे धाव घेतली. भांडण करणार्‍या सचिन व महेशचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान सचिनने महेशला सोडून तुरुंगअधिकारी पवार यांच्यावर लोखंडी पट्टीने वार केले. यात पवार याच्या उजव्या हाताला मनगटाजवळ नस कापली जावून दुखापत झाली आहे. सचिन ओढण्याच्या झटापटीत कारागृहातील कर्मचारी हिवरकर यांचाही पाय मुरगळला आहे. भांडणानंतर दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास सचिन याने स्वतःच त्याने डोके फोडून घेतले. उपचाराबाबत विचारले असता तो नकार देत असल्याचेही कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर यांनी बोलतांना सांगितले.

यापूर्वी न्यायालयाकडे तक्रार, लेखी समजही दिली
सचिन सैंदाणे हा कारागृहात नवीन येणार्‍या कैंद्याना पैशांच्या मागणीवरुन तसेच इतर कारणावरुन नेहमी मारहाण करत असतो. यापूर्वीही त्याने एकाला मारहाण केल्याने त्याच्याबाबत न्यायालयाकडे तक्रार केली होती. न्यायालयाने त्याला समन्स द्यावी असे पत्र मिळाले होते. त्यानुसार 14 जून रोजी त्याला समज देण्यात आली होती. तसेच यावेळी सैंदाणे याने यापुढे असे करणार नाही म्हणून लेखी लिहूनही दिले आहे. आता पुन्हा न्यायालयाकडे सैंदाणेची तक्रार करण्यात आली असून वरिष्ठांना प्रकाराबाबत कळविले आहे. न्यायालय तसेच वरिष्ठांच्या आदेशाने पुढील कारवाई करण्यात येईल, असे कारागृह अधीक्षक वांढेकर यांनी सांगितले.