खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात उद्योजकाचा आयशरखाली आल्याने मृत्यू

0

शहरातील चित्रा चौकातील घटना : आयशर ताब्यात

जळगाव – शहरातील गजबजलेल्या चित्रा चौकातील रस्त्यावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्न करतांना उद्योजकाचा ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ६.१० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान घटनेनंतर चौकात मोठी गर्दी झाली होती. यावेळी चौकात असलेल्या वाहतुक पोलीसांनी गर्दी बाजूला सारत ट्रकचालकाला ट्रकसह ताब्यात घेतले. अनिल श्रीधर बोरोले (वय ६८) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती शहरातील द्वारका इंडस्ट्री अ‍ॅन्ड ट्रान्स इलेक्ट्रीकलचे मालक अनिल श्रीधर बोरोले हे आज शनिवार असल्याकारणाने गावातील कामे आटोपून अ‍ॅक्टीव्हा क्र. एम.एच. १९ डीबी ४०४८ ने घरी जात होते. अत्यंत गजबज असलेल्या चित्रा चौकातुन जात असतांना चौकातील खड्डा चुकविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या प्रयत्नात अनिल बोरोले हे खाली कोसळले. यावेळी मागून येणार्‍या आयशर क्र. एम.एच. ०४ डीडी ६४५९ च्या चाकाखाली आल्याने चिरडले गेले अन् त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच चौकात मोठी गर्दी झाली होती. दरम्यान चौकात उभ्या असलेल्या वाहतुक पोलीसांनी आयशर ताब्यात घेतला आहे. मयत अनिल बोरोले यांच्या पश्‍चात पत्नी शितल बोरोले, मुलगा निरंजन बोरोले, भाऊ अशोक बोरोले, पांडुरंग बोरोले, डॉ. धनंजय बोरोले, भास्कर बोरोले, बहिण रमाताई किरण नेहते, एक मुलगी, जावाई असा परिवार आहे.


अपघाताचा फोन अन् बोरोले बंधू हादरले
चित्रा चौकात अपघात झाल्यानंतर अनिल बोरोले यांचा भ्रमणध्वनी रस्त्यावर पडला. यावेळी एका नागरिकाने त्यांच्या भ्रमणध्वनीवरून भाजपाचे माजी शहराध्यक्ष अरूण बोरोले यांना अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच बोरोले कुटूंबिय अक्षरश: हादरले. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अनिल बोरोलेंचा मृतदेह पाहताच आक्रोश केला.


दुचाकीवर जाणे जीवावर बेतले
अनिल बोरोले हे त्यांच्या द्वारका इंडस्ट्रीजचे काम पाहतात. आज शनिवार असल्याने औद्योगिक वसाहतीत उद्योग बंद असतात. गावातील कामे आटोपण्यासाठी अनिल बोरोले हे नेहमी कारने ये-जा करतात. आज मात्र ते अ‍ॅक्टीव्हा घेऊन गावातील कामे आटोपून घरी जाणार होते. मात्र चित्रा चौकात त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि दुचाकीवर जाणे त्यांच्या जीवावर बेतले.


आमदारांची धाव
अपघाताचे वृत्त कळताच आमदार राजूमामा भोळे यानीं घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर आमदार चंदूलाल पटेल यांच्यासह श्री. बियाणी व उद्योजक यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात धाव घेऊन बोरोले कुटूंबियांचे सांत्वन केले.


खड्ड्यांबाबत नागरिकांमधून संताप
शहरात प्रमुख रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यांबाबत नागरीकांनी अनेकदा तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. खड्ड्यामुळेच आज एका उद्योजकाला जीव गमवावा लागल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.