नगरभूमापन कार्यालयाच्या भोंगळ कारभाराचा आमदारांनाही मनस्ताप

0

उतार्‍यांसाठी नागरीकांची होते आर्थिक पिळवणूक

जळगाव – जिल्हाधिकारी कार्यालयातील सिटीसर्व्हे (नगर-भूमापन) कार्यालयात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दलाल सक्रिय आहेत. प्रमाणपत्रासाठी पंधरा रुपये शासकीय फी असताना चक्क शंभर रुपये आकारले जातात. नगरभूमापन व भूमी अभिलेख कार्यालयाच्या या भोंगळ कारभारावर आमदार राजूमामा भोळे यांनी संताप व्यक्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नगरभूमापन कार्यालयात नागरिकांना विविध प्रकारचे दाखले मिळतात. शेतीचा उतारा, शेती नावावर करणे, घर नावावर करणे, सिटीसर्व्हेचा रिपोर्ट मिळविणे यासह घर, शेती संबंधित प्रमाणपत्रे दिली जातात. याप्रमाणपत्रासाठी शासकीय शुल्क पंधरा रुपये आहे. मात्र आलेल्या व्यक्तींकडून अधिकचे शुल्क आकारले जाते. ते भरल्यावरही दहा ते पंधरा दिवस प्रमाणपत्रांसाठी फिरविले जाते. अनेकवेळा चकरा मारून त्रासलेल्या नागरिकांना तेथील दलाल गाठतो. तुमचे काम आजच व्हावयाचे असल्यास दोन हजारांची मागणी करतो. अन काय आश्‍चर्य दोन हजार रुपये देताच काही मिनिटात संबंधितास हवे ते प्रमाणपत्र मिळते. दररोज दलालीतून पन्नास हजार ते एक लाखांची कमाई होत असल्याचा अंदाज आहे. या कार्यालयाचे प्रमुख नगर भूमापन अधिकारी यशवंत बिर्‍हाडे आहेत. त्यांच्यावरील अधिकारी भूमी अभिलेख अधिकारी सुनील भोंगळे आहेत.
आमदारांनाही फिरवाफिरव
नगरभूमापन कार्यालयात उतारे, प्रमाणपत्रासाठी फिरवाफिरव केली जाते. शेवटी ज्याला प्रमाणपत्र पाहिजे असते त्याकडून दलाल दोन हजार घेऊन प्रमाणपत्र देत असल्याचे चित्र येथे आहे. नगर भूमापन कार्यालयातील कर्मचार्‍यांचा अनुभव आमदार राजूमामा भोळे यांनाही दोन दिवसापूर्वीच आला. त्यांच्या एका कार्यकर्त्यांना मोजणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने आमदार भोळे स्वतः नगरभूमापन कार्यालयात आले. तरीही अधिकारी नसल्याचे सांगून प्रमाणपत्र देण्यात आले नाही. याप्रकाराकडे जिल्हाधिकारी लक्ष देतील काय ? असा प्रश्‍न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.

नगरभूमापन कार्यालयाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. मला दोन दिवसापूर्वीच त्याचा अनुभव आला. एका कार्यकर्त्याला मोजमाप बाबत प्रमाणपत्र देण्यासाठी तब्बल दोन तास मी त्या कार्यालयात थांबलो. मात्र प्रमाणपत्र मिळाले नाही. या कार्यालयाच्या अनागोंदी बाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे.
राजुमामा भोळे, आमदार भाजप.