गाडी दुसऱ्याची नोटीस तिसऱ्याला
जळगाव: भुसावळ येथील रहिवासी योगेश्वर दत्तात्रय ढाके आणि त्यांच्या पत्नी प्रज्ञा ढाके यांना वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जळगाव शहर वाहतूक शाखेतर्फे नोटीस देण्यात आली आहे. मात्र दुचाकी दुसऱ्याची आणि नोटीस तिसऱ्यालाच असा हा प्रकार असून यातून वाहतूक शाखेचा सावळा गोंधळ समोर आला आहे. दुचाकी क्रमांक एमएच १९ बीएन ६७५० जिल्हा न्यायालयाच्या आवारात नो-पार्किंगमध्ये लावण्यात आली होती. या दुचाकीच्या छायाचित्रावरून वाहतूक शाखेकडून संबंधितांना नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र ती दुचाकी ज्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे, त्यांच्या नावावरच नाही. यावरून वाहतूक शाखेचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. नोटीसीमध्ये दुचाकीचे छायाचित्र देण्यात आले आहे, या दुचाकीवरील क्रमांक आणि नोटीसीत नमूद क्रमांकात देखील तफावत आढळून आली आहे. दरम्यान योगेश्वर दत्तात्रय ढाके आणि त्यांच्या पत्नी प्रज्ञा ढाके यांना नोटीसीद्वारे दंड भरण्याचे सांगण्यात आले आहे, तसेच दंड न भरल्यास हे प्रकरण न्यायालयात पाठविले जाईल असे सांगण्यात आले आहे.
वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यास आता संबंधित वाहनधारकाला थेट नोटीस पाठविण्यात येऊन दंड भरण्याचे सांगितले जाते. या निर्णयाचे स्वागत होत आहे. वाहतुक नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनधारक आणि पोलिसांमध्ये दंड भरण्यावर वाद होत होते, मात्र आता वाहनधारकांशी वाद न घालता, वाहनाचे छायाचित्र काढून थेट घरपोच नोटीस दिली जाते. या निर्णयाचे स्वागत होत आहे, मात्र वरील प्रकारावरून गोंधळ दिसून येत आहे.