अजून एक दिवसाने वेळापत्रक पुढे ढकलले; गळती दुरुस्तीला लागणार २४ तास
जळगाव :शहरातील मेहरूण परिसरातील चाटेमळा शेजारील १२०० व्यासाची पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली. या पाईपाईन दुरुस्तीचे काम मनपा पाणी पुरवठा विभागाकडून घेण्यात आले असून, दुरूस्तीला २४ तास लागणार असल्याने आज बुधवारी शहरात पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता डी.एस.खडके यांनी दिली.
मेहरुण भागात दुपारी ३ वाजेच्या सुमारास पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले. सुमारे अर्धातास पाणी वाया गेला आहे. यामुळे या भागात पाणीच-पाणी झाले होते. स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती पाणी पुरवठा विभागाला दिल्यानंतर या भागातील पाणी पुरवठा बंद करण्यात आला. शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या वाघूर धरणाकडून शहरात येणारी पाईपलाईन वेळोवेळी फुटत असल्याच्या घटना वारंवार घडत आहे. ८ जानेवारी ते ९ एप्रिल पर्यंतच्या दरम्यान १४ वेळा पाईपलाईन फुटल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढक लण्यात आला आहे. यंदा दुष्काळाची स्थिती असून, मनपा प्रशासनाने शहराला तीन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतला असताना पाईपलाईन फुटण्याचा प्रकारामुळे जळगावकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.