जळगावात उद्यापासून तीन दिवसाआड पाणी

0

महापालिकेचा निर्णय

जळगाव:अगोदरच तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या जळगावकरांना पुन्हा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण वाघुर धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता महापालिकेने तीन दिवसाआड चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत जळगाव शहराला दोन दिवसाआड तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. परंतु वाघुर धरणातील दिवसेंदिवस कमी होत जाणारी पातळी लक्षात घेता तीन दिवसाआड चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज ९ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. याबाबत महानगरपालिकेने पत्रक जाहीर केले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुर धरणात सद्यस्थितीत २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळयाचे दिवस सुरु असल्याने आणि भविष्यात होणाऱ्या बाष्पीभवन लक्षात घेता धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन म्हणून तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी भविष्यात होणारी पाणीटंचाई लक्षात घेता काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी केले आहे.