एसएमआयटी महाविद्यालय परिसरातील अतिक्रमणावर हातोडा

0

राजकीय दबावाला बळी न पडता आयुक्तांकडून कारवाई

जळगाव: गेल्या वर्षभरापासून शहरातील एसएमआयटी महाविद्यालय परिसरातील मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण काढण्याचा हालचाली सुरु होत्या अखेर मंगळवारपासून २० ते ३० फुटापर्यंत वाढलेल्या अतिक्रमणावर मनपा प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी स्थानिक रहिवाशी व राजकीय दबाव झुगारत थेट कारवाईचे आदेश दिले आहेत.
शिवाजी नगरउड्डाणपूलाच्या बांधकामामुळे जळगाव तालुका, चोपडा, यावलसह शहरातील शिवाजीनगर, गेंदालाल मीलसह इतर भागातील सर्व वाहतूक एसएमआयटी महाविद्यालय ते बजरंग बोगद्याचा रस्त्याकडून होत आहे. मात्र, या रस्त्यालगत अनेक व्यावसायिक व रहिवाश्यांनी मुख्य रस्त्यालगत २० ते ३० फुटापर्यंतचे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी या रस्त्यावरील अतिक्रमणाचे मोजमाप करून अतिक्रमण काढण्याचा सूचना दिल्या होत्या.

महापौरांनी घटना दिली भेट
मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे व नगरररचना विभागाचे पथक या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोहचल्यानंतर स्थानिक रहिवाश्यांनी कारवाई करू देण्यास विरोध केला. ही कारवाई होवू नये यासाठी महापौर सीमा भोळे यांच्याकडे देखील मागणी केली. महापौर सीमा भोळे यांनी घटनास्थळी येवून याबाबत रहिवाश्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन महापौरांनी रहिवाश्यांना दिले. याबाबत आयुक्तच निर्णय घेणार असल्याने नागरिकांनी आयुक्तांची भेट घ्यावे असा सल्ला देखील महापौरांनी दिला.

आयुक्त कारवाईवर ठाम
अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरु होताच स्थानिक रहिवाश्यांनी मनपात महापौरांची भेट घेतली. त्यानंतर महापौरांनी आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांना बोलावून घेतले. नाल्यावरील बांधकाम काढल्यास पावसाळ्यात नाल्याचे पाणी घरांमध्ये जाईल असे सांगत ही कारवाई चार महिन्यांपर्यंत करण्यात येवू नये अशी मागणी रहिवाश्यांनी आयुक्तांकडे केली. मात्र, आयुक्तांनी रहिवाश्यांची मागणी अमान्य करत ही कारवाई गरजेचे असून ती करावीच लागणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. नोटीस देवूनही नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण न काढल्यामुळे मनपाने कारवाई केली असून, याबाबत आता अभियंत्यांशीच बोला असे आयुक्तांनी सांगत कारवाई थांबविण्यास नकार दिला.

सप्टेंबरपर्यंत रुंदीकरण
या रस्त्यालगत असलेले सर्व अतिक्रमण आठ दिवसात काढण्यात येणार असून, रस्त्यालगत असलेला नाला काही अंशी सरकवला जाणार असून, सप्टेंबरपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. तसेच या रस्त्याचा खर्चासाठी मंजूर निधी सप्टेंबरपर्यंत खर्च करायचा आहे अशी माहिती बांधकाम अभियंता सुनील भोळे यांनी दिली.