दुचाकीचा कट लागल्याने प्राणघातक हल्ला ; दोघांना 2 वर्ष सश्रम कारावास

0

जिल्हा न्यायालयात निकाल ; प्रत्येकी 25 हजार रुपये दंडाची सुनावली शिक्षा

जळगाव : दुचाकीचा कट लागल्याचा राग येऊन दोघांनी चाकूने छाती तसेच पोटावर, हातावर वार करून जखमी करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना 02 जानेवारी 2014 रोजी शिवाजीनगरातील राधाकृष्णनगर दूध फेडरेशनजवळ घडली होती. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात संशयित मनोज उर्फ मन्या सपकाळे तसेच राहुल उर्फ बबलू सपकाळे (शनिपेठ) दोघांना दोन वर्ष सश्रम कारावास तसेच प्रत्येकी 25 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए. सानप यांच्या न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला.

बालाजीपेठ परिसरातील संतोष भगवान पाटील हे 2 जानेवारी 14 रोजी दुपारी 03.45 वाजेच्या सुमारास राधाकृष्ण नगर दूध फेडरेशनमार्गे पाळधी येथील मंदिरात दर्शनासाठी जात होते, यादरम्यान संशयितांनी दारूच्या नशेत दुचाकी चालवित पाटील यांना कट मारला. याचा जाब विचारल्याचा राग येऊन संशयीतांनी संतोष पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूने छाती तसेच पोटावर, हातावर वार करून जखमी केले होते. नंतर संशयित पसार झाले होते. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन ठाण्यात तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी जबाब घेतल्यावरून भादंवि कलम 307,504,510 तसेच शस्त्र कायदा कलम 4 /25 अन्यवे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.

3 महिन्यात सलग पाच खटल्यांत आरोपींना शिक्षा
न्यायाधीश जी.ए. सानप यांच्या न्यायालयात या खटल्याच्या चौकशीत सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम, फिर्यादी संतोष पाटील तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तपासी अधिकारी नेहते यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आलेले नव्हते. तथापि सरकारी वकील नीलेश डी.चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे यासंदर्भात महत्वाचे निवाड्याचा संदर्भ देऊन संशयितांचा गुन्हा शाबीतीसाठी हत्यार जप्तीची आवश्यकता नसल्याबाबत युक्तीवादातून सांगितले. सहायक सरकारी अभियोक्ता नीलेश चौधरी यांनी प्रभावी युक्तीवाद करुन मागील तीन महिन्यात सलग चौथ्या वेळेस व एकूण पाच वेगवेगळे गुन्ह्यात आरोपींना शिक्षा मिळवली आहे.