प्राणघातक हल्याप्रकरणातील आरोपीला अडीच वर्ष सश्रम कारावास

0

जिल्हा न्यायालयाचा निकाल ; धरणगाव पोलिसात होता गुन्हा दाखल

जळगाव : तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी प्रभाकर दशरथ पाटील (66, रा.घुमावल, ता.चोपडा) याला न्यायालयाने अडीच वर्ष सश्रम कारवास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांनी गुरुवारी हा निकाल दिला.

सुधाकर रतन पाटील हे 16 ऑक्टोबर 2008 रोजी सोनवद, ता.धरणगाव येथील त्यांच्या शेतात बैलगाडीने जात असताना त्यांचा मुलगा प्रभाकर व कृष्णा समोरुन येत होते. त्यावेळी प्रभाकर दशरथ पाटील याने प्रभाकर सुधाकर पाटील याला अडवून डोक्यात मागील बाजुस सुर्‍याने गंभीर दुखापत केली तर योगराज दशरथ पाटील याने कृष्णा आनंदा पाटील याला सळईने मानेवर तर मृत आरोपी तानकु दौलत पाटील याने कुर्‍हाडीने सुपडू पाटील व माधवराव पाटील यांना डोक्यावर, पायावर व खांद्यावर मारुन दुखापत केली होती. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासधिकारी आर.बी.देशमुख यांच्यासह कर्मचार्‍यांनी आरोपींना अटक केली होती.

16 साक्षीदार तपासले
तपासाधिकारी आर.बी.देशमुख यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारतर्फे 16 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारपक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन या खटल्यात फक्त जखमी साक्षीदार प्रभाकर सुधाकर पाटील यानेच आरोपीविरुध्द साक्ष दिली. इतर साक्षीदार फितूर झाले. इतर साक्षीदार गजानन पोपट सावंत, आत्माराम बंडू भोई, वैद्यकिय अधिकारी डॉ.अरविंद वानखेडे, डॉ.मिलिंद कोल्हे व तपासाधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. आरोपी प्रभाकर पाटील यास कलम 326 अंतर्गत दोषी धरण्यात आले. सरकारतर्फे अ‍ॅड.संभाजी जाधव व अ‍ॅड.निलेश चौधरी यांनी तर आरोपीतर्फे अ‍ॅड.हिंमत सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.