एलसीबीच्या पथकाने तरूणास घेतले ताब्यात
जळगाव – तलवारीसह असलेला फोटो व्हॉट्स अॅपवरून व्हायरल करणार्या तरूणाला आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडुन तलवार देखिल जप्त करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, वाघनगरातील शामनगरमध्ये राहणारा सचिन प्रकाश सोनवणे याने त्याच्याजवळ असलेल्या तलवारीसह फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. यासंदर्भात पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना सचिन प्रकाश सोनवणे हा घरी असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले,अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.श्री.नीलाभ रोहन यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकॉ. चंद्रकांत पाटील, पोहेकॉ. श्रीकृष्ण पटवर्धन, पोहेकॉ. दिनेश बडगुजर, पोहेकॉ. सुनिल पंडीत दामोदरे, चापोहेका. विनयकुमार भिमराव देसले, पोना. संदीप साळवे, पोहेेकॉ. जयंत चौधरी, पोना. नरेंद्र वारुळे, मपोहेकॉ. ललिता सोनवणे यांचे पथक तात्काळ रवाना केले.
वाघनगर जवळील शामनगर येथे पथक जावुन सचिन प्रकाश सोनवणे यास घरून ताब्यात घेतले. त्यास व्हायरल केलेल्या तलवारी बाबत विचारपुस केली असता त्याने तलवार सावखेडा शिवारात एका काटेरी झांडामध्ये ठेवलेली असल्याचे सांगितल्याने पथकाने ती तलवार जप्त करून सचिन प्रकाश सोनवणे (वय ३८) यांचेवर आर्मअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.