सोमवारी आचारसंहीता संपुष्टात येणार
जळगाव – गेल्या दिड महिन्यापासून जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने लागू असलेली आचारसंहीता दि. २७ रोजी संपुष्टात येणार असल्याने शहरातील विकासकामांचाही मार्ग मोकळा होणार आहे. रखडलेली कामे सुरू होणार असुन काही नविन कामांनाही सुरवात होणार आहे.
जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहीतेमुळे शहरातील विकासकामे ठप्प झाली होती. ठमहापालिकेची अनेक विकास कामे रखडली होती. मतमोजणी झाल्यानतंर आता चार दिवसात आचारसंहीता संपणार असल्याने या रखडेलेली विकास कामे मागी लागणार आहेत.
महानगरपालिकेत सत्ता मिळावल्यानंतर सत्ताधारी भाजपाने मनपा निवडणूक काळात सत्ता मिळाल्यानंतर महिनाभरात १०० कोटी रुपयांचा निधी शासनाकडून आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १६ ऑगस्ट २०१८ रोजी शासनाच्या नगरोथ्थान अंतर्गत १०० कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर झाला होता. मात्र हा निधी मंजूर झाल्यानंतर या निधीतून होणार्या कामांसाठीचा प्रस्ताव तयार विलंब लागल्याने शासनाची मंजुरी मिळाली नाही. त्यानतंर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे शासनाकडून मंजुरी व निविदा प्रक्रीया रखडून राहीली होती. या शंभर कोटी रुपयांच्या निधीमधून रस्त्यांची कामे तसेच प्रत्येक प्रभागातील विकास कामे घेण्यात आली आहे. यातील ५० कोटी रुपयांच्या निधीला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. तर उर्वरित ५० कोटी रुपयांच्या निधीला तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला आहे.
सोमवारनंतर कामे सुरू होण्याची शक्यता
सोमवारी म्हणजेच दि. २७ रोजी निवडणूक प्रक्रिया पुर्ण होणार असुन आचारसंहीता संपुष्टात येणार आहे. त्यामुळे शहरातील रखडलेली कामे सोमवारनंतर पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांना मान्यता मिळून निवीदा प्रक्रिया देखिल राबविली जाणार आहे.