वैजापूर परिसरातून दोघांना अटक : एक लाखाचा ऐवज जप्त
जळगाव : जळगाव,भुसावळसह अनेक ठिकाणी घरफोडी करून पसार होणार्या अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी एलसीबीच्या पथकाने चोपडा तसेच वैजापूर परिसरात ठाण मांडून अट्टल गुन्हेगारास जेरबंद करण्यात यशस्वी झाले. सुनिल बारेला (२१) गौर्यापाडा (चोपडा) तसेच कालूसिंग बारेला (१९) चहार्डी (चोपडा) अशी संशयीतांची नावे आहेत. दोघांकडून सहा मोबाईल तसेच चार लॅबटेब असा सुमारे ०१ लाख ७३ हजार किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.
घरफोडी करून मिळालेल्या पैश्यातून मौजमजा करणे, अशी जीवनशैली संशयीतांनी अंगीकारली होती. एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी त्यांच्या पथकातील कर्मचारी हेड कॉन्सटेबल शरीफ काझी, युनुस शेख तसेच सुरज पाटील यांना योग्य त्या सुचना देऊन आठ दिवसांपासून संशयीतांची माहिती काढुन ताब्यात घेण्याच्या सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने पथकाने चोपडा शहर, ग्रामीण हद्दीत सत्रासेन, वैजापूर,गवर्या पाडश या जंगल परिसरात आठ दिवस ठाण मांडून होते. संशयीतांची माहिती काढुन तसेच ते राहत असलेल्या ठिकाणाची माहिती काढुन पथकाने पोलीस निरीक्षक रोहोम यांना संपुर्ण माहिती दिली. नंतर पथकाने परिसरात जाऊन सुनिल बारेला (२१) रा. गोर्यापाडा (चोपडा) तसेच कालुसिंग बारेला (१९) चहार्डी (चोपडा) यांना अंकलेश्वर रोडवरील सातपुडा हॉटेलच्या बाजुला पानटपरीजवळ सापळा लावून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून भुसावळ बाजार पोलीस स्टेशनला दाखल गुन्हयातील दोन मोबाईल, सहा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, रामानंदनगर पोलीस स्टेशनला दाखल गुन्हयातील एक मोबाईल,जळगाव तालुका पोलीस स्टेशनला दाखल गुन्हयातील एक मोबाईल, शहादा (धुळे) पोलीस स्टेशनला दा खल गुन्हयातील दहा ग्रॅम वजनाचे सोने व एक मोबाईल तसेच चार लॅपटॉप असा सुमारे एक लाख ७३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. पथकातील हेकॉ शरीफ काझी, युनुस शेख, सुरज पाटील, विजय पाटील, नरेंद्र वारूळे, विकास वाघ, बापु पाटील, योगेश वराडे, गफुर तडवी, दर्शन ढाकणे, अशोक पाटील, इद्रीस पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयीतांना भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.