जळगाव –जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत चार तासात सरासरी १४.३६ टक्के मतदान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात १९ तर धुळे जिल्ह्यात १८ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान ११ वाजेनंतर मतदारांची गर्दी वाढली आहे.
सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान अमळनेर मतदार संघात १९.४२ टक्के तर सर्वात कमी भुसावळ ९.९० टक्के मतदान झाले आहे. यात चोपडा मतदारसंघ १४.४७ टक्के, रावेर १८.१९, भुसावळ ९.९०, जळगाव शहर १०.२६, जळगाव ग्रामीण १३.८३, अमळनेर १९.४२, एरंडोल १२.२९, चाळीसगाव १४.६४, पाचोरा १२.७७, जामनेर १५.७८, मुक्ताईनगर १८.१५ टक्के असे एकुण १४.३६ टक्के मतदान झाले आहे. एकंदरीत जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १४.३६ टक्के मतदान झाले आहे.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी जळगाव जिल्ह्यात पहिल्या दोन तासात अवघे ५ टक्के मतदान झाले. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात सर्वाधिक 6.78 टक्के मतदान झाले तर जळगाव शहरात सर्वात कमी म्हणजे २.४९ टक्के मतदान झाले आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी होणार्या मतदान प्रक्रियेवर पावसाचे सावट आहे. आज सकाळी तुरळक पाऊस सुरू राहील्याने मतदानाचा उत्साह फारसा दिसून आला नाही. सकाळी ७ वा. मतदानाला सुरवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासात जिल्ह्यात अवघे ५ टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. यात चोपडा मतदारसंघ ४.६७ टक्के, रावेर ६.७८, भुसावळ २.७६, जळगाव शहर २.४९, जळगाव ग्रामीण ४.६५, अमळनेर ५.५६, एरंडोल ३.८९, चाळीसगाव ५.०७, पाचोरा ३.७८, जामनेर ४.५२, मुक्ताईनगर ४.५२ टक्के असे एकुण ५ टक्के मतदान झाले आहे. एकंदरीत जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ४.२६ टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात सर्वाधिक 6.78 टक्के मतदान झाले. या ठिकाणी भाजपाचे उमेदवार हरिभाऊ जावळे, काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी, अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्यात लढत आहे. जळगाव शहरात सर्वाधिक कमी म्हणजे 2.49 टक्के मतदान झाले आहे. भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश भोळे आपले नशीब पुन्हा एकदा अजमावत आहेत.
मुक्ताईनगरात खडसे कुटुंबीयांचे
मुक्ताईनगर येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसे-खेवलकर, खासदार रक्षाताई खडसे, मंदाताई खडसे यांनी आज सहकुटुंब मतदान केले.
जळगावात आ. भोळेंसह महापौरांचे मतदान
जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील ३९४ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शहरातील महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांनी प्रताप नगरातील प्राथमिक शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला बजावला आहे. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी महापौर सीमाताई भोळे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. गेल्या दोन दिवसापासून पाऊस असल्यामुळे गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर फारसे मतदार नसल्याचे चित्र दिसत आहे. मतदार संघाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पावसामुळे मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत असला तरी दुपारपर्यंत गर्दी होईल अशी शक्यता आहे.
रावेरमध्ये आठ मतदान यंत्रात बिघाड
रावेर तालुक्यात मतदानाला सुरुवात होताच काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे प्रकार समोर आले. रावेर येथील आठ ठिकाणी मतदान यंत्र बदलण्यात आली असून, यात मतदानांच्यावेळी तीन ठिकाणी व चाचणीच्या वेळी पाच ठिकाणी यंत्रे बंद पडल्याचा प्रकार घडला. शिवाय रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथे पहिलेच मतदान केल्यानंतर यंत्रात बिघाड झाल्याचा प्रकार घडला. यामुळे मतदान प्रक्रियेला उशिराने सुरवात झाली.
अमळनेर येथील भाजपचे उमेदवार शिरीष चौधरी यांनी सहकुटुंब ग्लोबल स्कुल अमळनेर येथे मतदान केले. आमदार शिरीष चौधरी पत्नी अनिता चौधरी आणि मुलगा प्रथमेश शिरीष चौधरी यांनी मतदान केले.