जळगाव – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाची निवडणुकीची 21 जागांपैकी 10 जागांसाठीची मतदानाची प्रक्रिया रविवारी पार पडली. आज सकाळी 8 वाजेपासून गणेश कॉलनीतील जिल्हा बँकेच्या सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. जस जशी मतमोजणी पुर्ण होत होती तस तशी निवडणुक रिंगणातील उमेदवारांना निकाल ऐकण्याची उत्कंठा शिगेला पोहचली होती. दरम्यान, दुपारपर्यंत मोजणी पुर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजीसह पुष्पवृष्टी व आताषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.
गणेश कॉलनीतील जिल्हा बँकेच्या सभागृहात निवडणुक निर्णय अधिकारी व निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला चार विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातील मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये सर्वात अगोदर सकाळी 9 वाजेच्या सुमारास पहिला निकाल जाहीर करण्यात आल्याने यामध्ये यावल विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून महाविकास आघाडीतील सहकार पॅनलचे उमेदवार विनोदकुमार पाटील हे 25 मते घेवून विजयी झाले. त्यानंतर भुसावळ, चोपडा व रावेर विविध कार्यकारी सोसयटी मतदार संघाचा निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान, दुसर्या टप्प्यात अनुसुचित जाती जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, इतर संस्था व व्यक्तीगत सभासद संघ व सर्वात शेवटी महिला राखीव मतदार संघातील मतमोजणीला सुरुवात झाली आणि त्यानंतर निवडणुक निर्णय अधिकार्यांनी निकाल घोषीत केला.
उमेदवार ठाण मांडून
मतमोजणीला सकाळी 8 वाजेपासून सुरुवात झाली. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहणी खडसे- खेवलकर, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतिष पाटील, शैलजादेवी निकम, वाल्मिक पाटील, शामकांत सोनवणे यांच्यासह सहकार व शेतकरी पॅनलच्या उमेदवारांनी मतमोजणीच्या ठिकाणी ठाण मांडले होते. दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर पराभूत उमेदवारांनी मतमोजणीच्या ठिकाणाहून काढता पाय घेतला.
शेतकरी पॅनलच्या उमेदवारांचा दारुण पराभव
भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने महाविकासच्या आघाडीच्या सहकार पॅनलच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान नव्हते. परंतु महाविकास आघाडीतील असंतुष्ट व पक्षाने उमेदवारी न दिलेल्या उमेदवारांनी शेतकरी पॅनलच्या माध्यमातून महाविकास आघाडीतच्या उमेदवारांना आव्हान दिले होते. मात्र या पक्षातील उमेदवारांचा महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दारुनण पराभव केल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून आले.
दुपारी दीड वाजेच्या सुमारास मतमोजणीची प्रकिया आटोपल्यानंतर निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी बिनविरोध निवडून आलेले व मतदानात विजयी झालेल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली. यानंतर महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांचा गुलाब पुष्पाचा हार घालून व गुलाल उधळत फटाक्यांची आताषबाजी करीत विजयोत्सव साजरा केला. त्यानंतर विजयी उमेदवारांनी जिल्हा बँकेत देखील आनंदोत्सव साजरा केला.