अमळनेरात दुध संघाला परवानगी न देण्याचा ठराव

0

जिल्हा सहकारी दूध संघाची वार्षिक सभा

जळगाव : जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात दूध संघाला परवानगी मिळाल्यास दूध संघ अडचणी येईल, मात्र शासनाने अमळनेरच्या दुध संघाला जिल्हा दुध संघाची एनओसी न घेता परवानगी दिली आहे. या दूध संघाची परवानगी नाकरण्याची मागणी सभासदांनी केली व शासनाकडे परवानगी न देण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. तसेच प्राथमिक संस्थाच्या शेअर भांडवलवर १० टक्के लाभांश देण्याचे देखील ठरविण्यात आले.
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी दुध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार एकनाथराव खडसे उपस्थित होते. यावेळी कार्यकारी संचालक संजीवकुमार गौतम,आ.सुरेश भोळे,आ. किशोर पाटील, माजी खासदार वसंराव मोरे, प्रमोद पाटील आदींसह संचालक उपस्थित होते. मुक्ताईनगर तालुक्यातील एकनाथ महाजन यांनी हा मुद्दा मांडला होता. प्रत्येक तालुक्यावर दूध संघ उभे राहायला लागले तर जिल्हा दूध संघात दूधच येणार नाही व २००५ सारखी परिस्थिती उद्भवेल. यापुर्वी शासनाने चाळीसगाव येथे दुध संघाला शासनाने परवानगी दिली होती. कालांतराने तो दुध संघ बंद करून जिल्हा दुध संघात समाविष्ट करावा लागला. त्यामुळे शासनाकडे ठराव पाठवून अमळनेरच्या दुध संघाला परवानगी नाकारण्याचा ठराव करण्यात आला. वेळ प्रसंगी दुध संघाने न्यायालयात लढा द्यावा अशी मागणी करण्यात आली.


ठरावाबाबत शासनाकडे पाठपुरावा करू – आ.खडसे
अमळनेरच्या नविन दुध संघाच्या बाबत हरकत नोंदविल्यास त्या दूध संघाला कायमस्वरूपी रजीस्ट्रेशन मिळणार नाही. आपण ठराव करून शासनाने अशी परवानगी देऊ नये, अशी विनंती करू व शासनही मान्य करेल, असे आमदार एकनाथराव खडसे यांनी सूचविले. त्यानंतर कुठल्याही दूध संघ उभारण्यास शासनाने परवानगी देऊ नये, असा एकमुखी ठराव करण्यात आला.या ठरावाबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन आ.एकनाथराव खडसे यांनी केले.सुदैवाने जिल्हा दूध उत्पादक संघात राजकारण नाही, राजकारण नसल्यानेच या संघाची प्रगती झाली आहे अन्यथा हा संघ डबघाईस यायला वेळ लागणार नाही, असे मत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले.


दुध संघाला ३ कोटी ११ लाखाचा नफा

दुध संघाने प्रतिदिन ३ लाख २८ हजार लिटर्स दूध संकलनाचा गेल्या ४६ वर्षातील उच्चांक केला असल्याची माहीती अध्यक्षा मंदाताई खडसे यांनी दिली. त्या म्हणाल्या की, दुध संघाने वर्षभरात ४५४ कोटी रूपयांच्या वार्षिक उलाढाल केली असून संघाला ’अ’ वर्ग मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यासह ३ कोटी ११ लाख रूपयाचां नफा झाल्याचे सांगण्यात आले.जीएसटीच्या मुद्द्यावरूनही सभासदांनी आक्रमक भूमिका मांडली व मूळ भाव व वाढीव दर स्वतंत्र असावे अशी मागणी केली. या वर्षी अंदाज पत्रकापेक्षा २० कोटी ७० लाख २५ हजारांपेक्षा अधिक खर्च झाल्याचे सांगण्यात आले.