स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
जळगाव : गॅस सिलिंडर घेण्यासाठी पतीने पाठविले अशी महिलेस बतावणी करून नंतर कपाटात ठेवलेले दागिनेही देण्यास सांगीतले,असे सांगून चोरी करणारे सराईत दोन गुन्हेगारांना एलसीबीच्या पथकाने गोपनीय माहितीवरून चारठाणा येथुन जेरबंद केले आहे. राजु कोळी तसेच एक अल्पवयीन (चारठाणा ता.मुक्ताईनगर)यांचा संशयितांमध्ये समावेश आहे.
या संशयितांनी बुलडाणा, अकोला येथे अनेक ठिकाणी घरामध्ये असलेली महिला ही एकटी आहे ही संधी हेरून तिच्या पतीने निरोप दिला आहे की मला आपल्याकडील गॅस सिलिंडर घेण्यास पाठविल्याचा बनाव करत असायचे. नंतर कपाटातील दागिनेही देण्यास सांगितले आहे, असे सांगून चोरी करत होते. ०२ मे रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास उघड्या घरातून दोन अज्ञात व्यक्तींनीसोन्याच्या दागिन्यांसह रोख रूपये गॅस सिलिंडर चोरून नेल्याने भुसावळ बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांच्यासूचना व मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी संशयितांच्याशोधकामी एलसीबीचे पथक रवाना केले होते. गोपनीय माहितीवरून पथकाने चारठाणागावी येऊन शोध घेतला असता चौकात पथकाने दोघांना ताब्यात घेतले. गुन्ह्याची संशयितानी कबुली दिली असून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यात गॅस सिलिंडर व दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्ह्याकामी वापरातील दोन दुचाकी पथकाने हस्तगत केल्या आहेत.एलसीबी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील, हेड कॉन्स्टेबल अनिल इंगळे, संजय सपकाळे, सुरेश महाजन, संतोष मायकल, रमेश चौधरी, अनिल देशमुख, दीपक पाटील, इंद्रीस पठाण, दर्शन ढाकणे यांनी कारवाई केली.