मतदार यादीत नाव असल्याची खात्री करावी- प्रभारी जिल्हाधिकारी गाडीलकर
जळगाव – भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने दिनांक १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत अद्यापही मतदार नोंदणी न झालेल्या नागरिकांना मतदार यादीत आपले नांव नोंदविता यावे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने आणखी संधी दिली असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर झाला असून याबाबतची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. गाडीलकर बोलत होते. याप्रसंगी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, निवडणूक तहसीलदार सुरेश थोरात, नायब तहसीलदार श्री. कळसकर यांचेसह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
असा आहे संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी तसेच मयत, दुबार, स्थलांतरीत, मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी दिनांक १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १५ ते ३० जुलै, २०१९ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. याअनुषंगाने मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रमाचे विविध टप्पे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार १५ जुलै रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात आली आहे. तर १५ ते ३० जुलै या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहे. तसेच २० व २१ आणि २७ व २८ जुलै, २०१९ या तारखांना मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ५ ऑगस्ट रोजी पर्यवेक्षक /सहाय्यक मतदार नोंदणी/मतदार नोंदणी अधिकारी यांचे कडून मतदार याद्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यांचेकडून तपासणी होवून आलेले दावे व हरकती १३ ऑगस्ट, २०१९ रोजी निकाली काढण्यात येणार असून १६ ऑगस्ट, २०१९ रोजी उपजिल्हाधिकारी निवडणूक/जिल्हा निवडणूक अधिकारी/मतदार यादी निरीक्षक यांचेद्वारे मतदार याद्यांची तपासणी, डाटाबेसचे अद्यावतीकरण, परवणी याद्यांची छपाई इत्यादि कामे पुर्ण करण्यात येणार असून १९ ऑगस्ट, २०१९ रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे.तरी मतदार याद्यांच्या दुसर्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व नागरिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी सक्रीय सहभाग नोंदवून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी मतदार याद्या अचूक व परिपूर्ण होण्यास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.