रुग्णालयात जाण्यावरुन कैदी भिडले ; ब्लेडने वार केल्याची माहिती
जळगाव – प्राणघातक हल्लयाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कारागृहातील दोन कैद्यांचे भांडण सोडविण्यास गेलेले तुरुंग अधिकारी किरण संतोष पवार यांच्यावर भांडण करणार्यांमधील सचिन दशरथ सैंदाणे वय 30 या कैद्याने लोखंडी पट्टीने वार केल्याची घटना मंगळवारी घडली होती. या घटनेला दोन दिवस उलटत नाही, तोच तुरुंग अधिकार्यावर हल्ला करणार्या सचिन सैंदाणे या कैद्याने शुभम देशमुख या दुसर्या कैद्यावर वार करुन त्याला जखमी केल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. सलगच्या या घटनेमुळे कैद्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्या या घटनेमुळे कारागृह प्रशासनाने कैद्यासोबतच्या नातेवाईकांच्या मुलाखती होवू दिल्या नाहीत.
जेवणावरुन कैदी भिडले
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 6.30 सुमारास कारागृहात शुभम देशमुख हा कैदी ब्रश करत होता. जेवणावरुन (जेवणाच्या हंडीवरुन) शुभम व सचिन सैंदाणे या दोघा कैद्यांमध्ये वाद झाले. आधी झटापट झाली. यानंतर काही वेळाने पुन्हा वाद होवून या वादातून सचिनने शुभमच्या पाठीवर दाढी करायच्या ब्लेडने पाठीवर वार केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारागृह अधिक्षकांनी माहिती जाणून घेतली. कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर यांनी घटनेला दुजोरा दिला असून ब्लेड नव्हे तर लोखंडी पत्र्याने मारल्याची माहिती त्यांनी दिली. शुभम याच्यावर जळगावासह विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून तो अमळनेर येथील हाणामारीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती मिळाली आहे. शुभमवर कारागृहातच उपचार करुन त्याला दुसर्या बॅरेकमध्ये हलविण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे.
तीन वाजेपर्यंत नातेवाईकांच्या मुलाखती बंद
शुक्रवारी घटनेनंतर कारागृह अधीक्षक यांनी कर्मचार्यांनी झाडाझडती घेतल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर नियमितप्रमाणे सकाळच्या सत्रात होणार्या नातेवाईकांच्या मुलाखती होवू देण्यात आल्या नाहीत. दुपारी तीन वाजेच्या सुमारास कैद्यांसोबत नातेवाईकांच्या मुलाखती सुरु झाल्या. कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी येणार असल्याचीह यावेळी चर्चा होती.