विधानसभेची चाचपणी होणार : तरूणांना अधिक संधी
जळगाव – आगामी काही महिन्यात होणार्या विधानसभा निवडणूकांसाठीची चाचपणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे प्रभारी दिलीप वळसे-पाटील हे येत्या आठ दिवसात दौरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना दिली.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन बैठक झाली. या बैठकीबाबत माहिती देतांना जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांनी सांगितले की, सकाळी उमेदवार, नेते आणि पक्षाध्यक्षांची बैठक झाली. त्यानंतर सामुहीक बैठक झाली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची अधिक चर्चा न करता विधानसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच जय्यत तयारी करण्याचे आदेश पक्षाध्यक्षांनी दिले आहे. त्यानुसार येत्या आठ दिवसात जिल्ह्याचे प्रभारी आमदार दिलीप वळसे-पाटील हे जिल्हा दौरा करणार असुन या दौर्यात ते विधानसभा निवडणूकीबाबत चाचपणी करणार आहे. ही चाचपणी झाल्यानंतर त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण कदापी होणार नसल्याचेही यावेळी बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या बैठकीला राष्ट्रवादीचे माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, आमदार डॉ. सतीश पाटील, माजी आ. दिलीप वाघ, राजीव देशमुख, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, युवकचे अध्यक्ष अभिषेक पाटील, संजय चव्हाण, अरविंद मानकरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
तरूणांना संधी दिली जाणार
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी पक्की आहे. विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी लवकरच जाहीर केल्या जाणार आहे. त्यासाठी प्रभारी जिल्हा दौरे करणार आहे. विधानसभेसाठी तरूण उमेदवारांना सर्वाधिक संधी यावेळी दिली जाणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांनी सांगितले.