उपाययोजनांसाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ
जळगाव – जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता अधिकच तीव्र झाली असुन २१९ गावांना १९१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढतच असुन जिल्ह्याची भूजल पातळी देखिल खोल जात आहे.
जिल्ह्यात दुष्काळाची परीस्थीती अत्यंत बिकट होत आहे. वाढत्या तापमानामुळे विहीरींची पाणी पातळी दिड ते दोन मिटरने खोल गेली आहे. जिल्ह्यातील बहुतांश पालिका क्षेत्रात १० ते २० दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. जनावरांना देखिल पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे. अशा परीस्थीतीत टंचाई कृती आराखड्याच्या माध्यमातुन टँकर, विहीर अधिग्रहण, तात्पुरती पाणीपुरवठा योजना, नविन विंधन विहीर घेणे, नविन कुपनलिका घेणे, विहीर खोलीकरण, नळ पाणीपुरवठा योजनांची दुरूस्ती करणे अशा उपाययोजना राबविल्या जात आहे. जिल्ह्यात यंदा टँकरच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
२१९ गावात १९१ टँकर (कंसात गावांची संख्या)
जिल्ह्यातील २१९ गावांमध्ये १९१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक ३९ गावांना ४० टँकर, अमळनेर ३५ (५३ गावे), जळगाव ७ (८ गावे), जामनेर ३७ (३६), धरणगाव ४(४), एरंडोल ३ (१), भुसावळ ६(६), मुक्ताईनगर १(१), बोदवड ८ (७), पाचोरा २२ (१९), भडगाव ७ (८), पारोळा २४(३४) टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
५५ गावात ५२ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना
जिल्ह्यातील ५५ गावात ५२ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना राबविल्या जात आहे. तर २७७ गावात २८४ विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. ७४ गावात १४२ नविन विंधन विहीर, ४३ गावात ६० नविन कुपनलिका, ६९ गावांमध्ये ५३ विहीरींचे खोलीकरण तर २ गावात नळ पाणीपुरवठा योजनांची दुरूस्ती करण्यात आली आहे.
उपाययोजनांना मुदतवाढ
राज्यातील दुष्काळाची परीस्थीती लक्षात घेता शासनाने दुष्काळी जिल्ह्यांमध्ये टंचाईच्या उपाययोजना करण्यासाठी दि. १५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचे आदेशही निर्गमीत करण्यात आले आहे.