लाखांचे वीजबील, पीककर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

0

एरंडोल तालुक्यातील घटना ; मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून केले विषप्राशन

जळगाव : गेल्या वर्षी दुष्काळाच्या झळा, यावर्षी सततचय पावसामुळे पीकांची नासाडी, यामुळे पीककर्ज व मोटारीचे वीजबिलाचे 1 लाख रुपये फेडायचे कसे व त्यात दहा ते बारा वर्षापासूनच्या गुडघेदुखी, मधुमेह, भंगदर या सारखे आजार या नैराश्यातून आत्महत्या करीत असून यात कुणालाही जबाबदार धरु नये अशा आशयाची चिठ्ठी लिहून लक्ष्मण ओंकार पाटील वय 70 रा. कढोली ता. एरंडोल या शेतकर्‍याने विषप्राशन करुन जीवन संपविल्याची घटना शनिवारी सकाळी समोर आली आहे.

दुध विक्री करणार्‍या तरुणाला आढळला मृतदेह
लक्ष्मण पाटील यांच्याजवळ दहा भिगे वडीलोपार्जीत शेती आहे. गावाला जातो, असे सांगून ते शुक्रवारी घराबाहेर पडले होते. मात्र पुन्हा घरी परतले नाही. घरच्यांनी शोध घेतला असताही ते मिळून आले नाही. शनिवारी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास कढोली येथील दुध दुचाकीवरून जळगावला वैजनाथ मार्गे नेत असता कोणी तरी अनोळखी व्यक्ती शेताजवळ पडलेला असल्याचे तरूणास दिसले. तरूणाने ही माहिती गावात दिली. गावाचे पोलीस पाटील रामदास सोनवणे हे घटनास्थळी रवाना झाले. यानंतर ते कढोली येथील लक्ष्मण पाटील असल्याची ओळख पटली. यानंतर धरणगाव पोलिसांनी घटनेची माहिती दिली. वाहन मागवून बेशुध्दावस्थेतील लक्ष्मण पाटील यांना आज सकाळी जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविले असता तपासणीअंती वैद्यकीय अधिकार्‍यांनी पाटील यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी डॉ. अपूर्वा चित्ते यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. लक्ष्मण पाटील यांच्या पश्चात पत्नी लिलाबाई, मुले विवाहित हिंमत, लिलाधर तसेच विवाहित मुली संगिता , छोटीबाई असा परिवार आहे. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

अशी आहे सुसाईड नोट
मी लक्ष्मण ओंकार पाटील वय 70 लिहितो की, माझेवर एक लाख रूपये पीक कर्ज व इलेक्ट्रीक मोटारीचे एक लाख रूपये बिल व मागील वर्षाच्या दुष्काळाच्या झळा व यावर्षी सतत च्या पावसाने पीकांची झालेली व मला लागलेल्या आजारांच्या व्याधी, 10/12 वर्षापासून मुळ व्याध असून दोन वर्षापूर्वी हात मोडला आहे. डायबेटीस सुध्दा आहे, दोन महिन्यांपासून गुडघेदुखीाचा लागलेला आजार, हे आजार जेवढे औषध घ्यावे तेवढेच बरे वाटते, पुन्हा जसेच्या तसे होते, या नैराश्यापोटी मी आत्महत्या करीत आहे, माझे आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, मी स्वतः जबाबदार आहे, कोणीही कुणाला त्रास देवू नये, आपला लक्ष्मण ओंकार पाटील, असा मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचा आशय आहे.