ग.स. सोसायटीच्या सहकार गटात फूट

0

अध्यक्षपदी मनोज पाटील तर उपाध्यक्षपदी श्यामकांत भदाणे विजयी

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी मनोज पाटील यांची तर, उपाध्यक्षपदी श्यामकांत भदाणे यांची निवड जाहीर करण्यात आली. सहकार गटात फुट पडल्यामुळे या निवडणुकीत माजी अध्यक्ष तुकाराम बोरोले, माजी अध्यक्ष विलास नेरकर यांची खेळी यशस्वी झाली असून अध्यक्ष बी.बी.पाटील यांच्या गटाला पराभव पत्करावा लागला.
पतपेढीत सत्तेवर असलेल्या सहकार गटात अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे अर्ज भरतांना फुट पडली. सहकार गटाचे अध्यक्ष बी.बी. पाटील यांनी अध्यक्ष पदासाठी उदय पाटील आणि उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर सोनवणे यांचे नाव सुचविले होते. परंतु तुकाराम बोरोले, विलास नेरकर यांच्यासह ११ संचालकांनी वेगळी चुल मांडून अध्यक्षपदासाठी मनोज पाटील तर, उपाध्यक्षपदी श्यामकांत भदाणे यांचे नाव पुढे करण्यात आले होते. निवडणूक अधिकारी के.पी.पाटील यांनी मतदान घेतले असता एकूण २१ संचालकांपैकी ११ संचालकांनी मनोज पाटील यांना मतदान केले असून १२ संचालकांनी श्यामकांत भदाणे यांना मतदान केले. तसेच उदय पाटील यांना १० संचालकांचे व ज्ञानेश्वर सोनवणे यांना ९ संचालकांनी मतदान केल्यामुळे निवडणूक अधिकार्‍यांनी अध्यक्षपदासाठी मनोज पाटील, तर उपाध्यक्षपदी श्यामकांत भदाणे यांची निवड जाहीर केली.

११ संचालकांचा स्वतंत्र गट
जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत लोकमान्य गटाचा पराभव करुन सहकार गटाने दणदणीत विजय प्राप्त केला होता. सहकार गटाचे अध्यक्ष बी.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व २१ संचालक निवडून आले होते. सहकार गटाने एक हाती सत्ता मिळवून विरोधकांचा सुपडा साफ केला होता. परंतु चार वर्षानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीदरम्यान सहकार गटात फुट पडून ११ संचालकांनी स्वतंत्र गट केला.

संस्थेची बदनामी केल्याने शिकविला धडा
एकाच गटात फुट पडल्यामुळे अर्धागट सत्तेत तर अर्धागट विरोधी बाकांवर बसण्याची वेळ ग.स. सोसायटीच्या संचालकांवर आली आहे. याचे नेमके कारण काय, असा प्रश्न संचालकांना विचारला असता माजी अध्यक्ष तुकाराम बोरोले, विलास नेरकर यांनी सांगितले की, आम्ही सर्व एकत्र काम कारीत होतो. परंतु गेल्या वर्षभरात आमच्याच संस्थेची कागदपत्रे काही संचालकांकडून विरोधकांना पुरविली जात होती व संस्थेची बदनामी केली जात होती. नको ते प्रयत्न केले जात होते म्हणून हा निर्णय घेऊन नवीन गट निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बोरोले सभागृह नेते
माजी अध्यक्ष बोरोले व विलास नेरकर यांच्या नेतृत्वाखाली नवीन गट निर्माण झाला असून या गटाला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत यश आले आहे. या गटाचे सभागृह नेते म्हणून तुकाराम बोरोले यांची निवड करण्यात आली आहे. संचालक मनोज आत्माराम पाटील, श्यामकांत भानुदास भदाणे, तुकाराम गोविंदा बोरोले, यशवंत पंडित सपकाळे, नथ्थू सिताराम पाटील, सुनील निंबा पाटील, सुनील अमृत पाटील, अनिल कौतिक गायकवाड, विश्वास राजाराम सूर्यवंशी, विलास यादवराव नेरकर, सुभाष देशमुख जाधव यांचा नवीन गटात समावेश आहे. तसेच उर्वरित दहा संचालकांनी उदय पाटील यांना मतदान करुन विरोधीगटात राहणे पसंत केले आहे.

हुकूमशाही दडपशाहीला विरोध
माजी अध्यक्ष विलास नेरकर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर आपली प्रतिक्रया देतांना सांगितले की, हुकमशाही, दडपशाहीला आमच्या गटात थारा राहणार नाही. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आमची भूमिका आहे. या पूर्वी होणारी दडपशाही थांबविण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.
विलास नेरकर, संचालक

पंधरा वर्षांपासून संचालक म्हणून निवडून येत आहे. संधी दिल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. तसेच मिळालेल्या संधीचं सोनं करुन सभासदांच्या हितासाठी जास्तीत जास्त काम करेल.
श्यामकांत सोनवणे, उपाध्यक्ष ग.स.

सभासदांना योग्य पद्धतीने कर्ज वाटप करण्यावर आमचा भर राहील, सभासदांचे हित जोपासले जाईल, विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली प्रबोधिनी चांगली चालावी याकरीता प्रयत्नशिल राहू.
मनोज पाटील, अध्यक्ष ग.स.

निवडीनंतर पैसे वाटपाचा आरोप
जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप संचालक उदय पाटील यांनी केला आहे. अकरा संचालक सहकार गटातून वेगळे झाले असून त्यांनी प्रत्येकी ३ लाख रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच माजी अध्यक्ष विलास नेरकर आणि तुकाराम बोरोले यांनी सहकार गटात फुट पाडली असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी सहकार गटाचे उपाध्यक्ष एस.एस.पाटील, झांबरआण्णा पाटील, ए.के.पाटील, रमेश शिंदे, व्ही.झे.पाटील, आर.एस.बाविस्कर, उत्तमराव पाटील आदी श्रेष्टीसह संचालक अजबसिंग पाटील, के.पी.चव्हाण, ज्ञानेश्वर सोनवणे, देवेंद्र पाटील, महेश पाटील, भाईदास पाटील, विक्रमादित्य पाटील, रागिणीताई चव्हाण, विद्यादेवी पाटील आदी उपस्थित होते.

फुटलेल्यांशी संबध नाही- बी.बी.आबा पाटील
दरम्यान, सहकार गटाचे अध्यक्ष बी.बी.पाटील यांनी फुटलेल्या ११ संचालकांचा सहकार गटाशी कोणताही संबध शिल्लक राहिला नसल्याचे सांगून आगामी निवडणुकांमध्ये त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही असे स्पष्ट केले. आजपर्यत आम्ही घेतलेला निर्णय अंतिम राहिला आहे. चर्चेतून विषय सोडविण्यासठी सर्वांना बोलाविण्यात आले होते. चर्चा केली असती तर, उदय पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे यांनी माघार घेतली असती मात्र, त्यांनी चर्चेस नकार दिला. ज्यांनी नवीन गट तयार केला ते मुळात सहकार गटाचे एकनिष्ठ नव्हतेच परंतु त्यांच्या सोबत आमचेही काही गेले. एन.एस.पाटील यांना आम्ही निमंत्रित सदस्या म्हणून घेतले होते मात्र, त्यांनी देखील दुसर्‍या गटाशी हातमिळवणी केल्याचे दु:ख आहे.

बंदद्वार चर्चा
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची वेळ निश्चित झाल्यानंतर सकाळी ११ वाजता अर्जभरणे सुरु झाले. अध्यक्षासाठी उदय पाटील व उपअध्यक्षासाठी अजबसिंग पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. दरम्यान, उपाध्यक्षपदासाठी अजबसिंग पाटील इच्छुक नसल्यामुळे त्यांच्या जागी ज्ञानेश्वर पाटील यांचे नाव निश्चीत करण्यात आले मात्र, ऐन वेळी सहकार गटातील अकरा संचालकांनी दोघांच्या नावाला विरोध करुन अध्यक्ष पदासाठी मनोज पाटील, उपाध्यक्षपदासाठी शामकांत भदाणे यांचे अर्ज भरले त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, दोन्ही गटातील संचालक व जेष्ठ संचालक यांची बंदद्वार चर्चा झाली. परंतु चर्चेत कोणतेही निष्पन्न न झाल्याने माघारीच्या मुदतीपर्यंत दोन्ही गटापैकी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले नसल्यामुळे निवडणुक अधिकार्‍यांनी मतदान घेतले. यात अध्यक्षपदासाठी मनोज पाटील यांना ११ मते पडली तर, उदय पाटील यांना १० मते पडले त्यामुळे मनोज पाटील विजयी झाले. तसेच ज्ञानेश्वर सोनवणे यांना ९ मते पडली असून शामकांत भदाणे यांना १२ मते मिळाल्याने भदाणेंचा विजय झाला.