महसूलच्या नाकावर टिच्चून अवैध वाळूचे पाच डंपर पोलीसांनी पकडले

0

राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिलेले पत्र गायब

जळगाव : अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून तिची वाहतूक करत असलेल्या पाच डंपर वाहनांना वाहतुक पोलिसांनी मंगळवारी तपासणी केली असता तीन वाहनांच्या चालकांजवळ चलन पावत्या नसल्याचा प्रकार आकाशवाणी चौकात समोर आला. महसूल प्रशासनाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांच्या मदतीने तीन डंपर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली. तर पावती असलेल्या दोन डंपरना सोडून देण्यात आले.
वाहतुक शाखेचे पोलीस याठिकाणी डयूटी बजावत असताना शिवकॉलनीकडून वाळू भरून डंपर येत होते. या वाहनांवरील चालकांना थांबवून चौकशी केली असता तीन डंपर चालकांजवळ चलनाच्या पावत्या नव्हत्या. पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांनी तसेच महसूल कर्मचार्‍यांनी अधिक चौकशी करून खात्री केल्यानंतर पोलिसांच्या मदतीने ही वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात हलविण्यात आले. पोलिसांनी वाहने पकडल्याची माहिती कळाल्यानंतर वाळू व्यावसायीकांनी याठिकाणी धाव घेतल्याने गर्दी झाली. डंपर क्रमांक एम.एच. १२ सी.वाय. १२८४ तसेच एम.एच. १९ १३७१ या वाहनांकडील चालकांकडे चलन पावत्या आढळून आल्या. त्यामुळे हे दोन्ही वाहने सोडून देण्यात आले. तर डंपर क्रमांक एम.एच. १९ बी.एम. १९१९, एम.एच. १९ बी.एम. ४४४३, एम.एच. १९ सी.वाय. ५२५२ या चालकांजवळ चलन पावत्या मिळून आल्या नाही. एम.एच. १९ सी.वाय. ५२५२ या डंपरच्या पुढे जळगाव पासिंगचा तर मागे गुजरात पासिंगचा नंबर दिसून आल्याने अवैध वाहनांचा वाळू वाहतूकीसाठी वापर होत असल्याचे उघड झाले.पाच वाहने एकाचवेळी पकडली गेल्याने नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून चोरटी वाहतुक होत असल्याचा प्रकार या घटनेतून समोर आला आहे. घटनास्थळी वाळू व्यावसायीकांनी गर्दी केल्याने याठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान वाळू वाहतुक तसेच उत्खनासाठी असलेल्या चलन पावत्या बनावट बनवून त्याचा वापर केला जात असल्याचा संशय सुत्रांनी व्यक्त केला असून यासंदर्भात महसूल प्रशासन यापुढे काय पाऊल उचलते,याकडे लक्ष असणार आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांचे पत्रच गायब
वैजनाथ टाकरखेडा नदी पात्रात दररोज पहाटे पाच वाजेपासून डंपर उतरतात सुमारे २०० वाहनांनी वाहतूक होत असल्याची तक्रार आमदार डॉ सतिष पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉअविनाश ढाकणे यांच्या कडे केली होती . लेखी पत्राची पोच देखील घेतली होती परंतू सुमारे महिना भरापूर्वी दिलेले हे पत्र वाळू माफियांनी जिल्हाधिकारी किंवा अप्पर जिल्हाधिकारी पर्यंत देखील पोहचू दिले नाही. याचाच अर्थ वाळू माफियांनी काही महसूलचे कर्मचारी हाताशी धरुन हे पत्र गायब केले असल्याची शक्यता आहे. आ सतिष पाटील यांच्या तक्रारीकडे दुर्लेक्ष झाले असून महसूल च्या अधिकायांचे सावखेडा ठेकेदारांशी अर्थपूर्ण हातमिळावणी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आ.डॉ. सतिष पाटील यांनी सांगितले की, मतदारसंघातील वैजनाथ टाकरखेडा नदी पात्रात वाळवंट करुन टाकला आहे.सावखेडा ठेक्याची तक्रार केली आहे. परंतू प्रशासनाने कुठलेही पाऊल उचलले नाही.पावसाळ्यात या खड्डयांमध्ये जिवीत हानी होऊ शकते याला जबाबदार महसूल प्रशासन राहणार तसेच नदी पात्रात आंदोलन देखील करु असे आ. डॉ. पाटील यांनी सांगितले.