जिल्हा कारागृहाची उप कारागृह महासंचालक दक्षता पथकाकडून पाहणी
जळगाव- विविध गोष्टींमुळे चर्चेत असलेल्या जिल्हा कारागृहाला उप कारागृह महासंचालक यांच्या दक्षता पथकाने भेट रविवारी दुपारी 1 वाजता अचानक भेट दिली. या पाहणीत पथकाला कारागृहातील एका बॅरेकमध्ये कैद्यांकडे 26 हजाराची रोकड मिळून आल्याचे खात्रिलायक वृत्त आहे. पथकाच्या या पाहणीमुळे कारागृहातील कर्मचार्यांमध्ये एकच धांदल उडाली होती. दरम्यान याबाबत प्रभारी कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर यांना संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी स्विकारला नाही.
पथकाला या पाहणीत कारागृहात धान्य यासह रोख रक्कम व काही आक्षेपार्ह वस्तू आढळल्या आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पथकाने रात्री उशीरापर्यंत कारागृहात चौकशी केल्याची माहिती आहे. पथकाने सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. दक्षता पथकाने केलेल्या अचानकच्या या पाहणीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.