खेडी परिसरात बांधकाम ठेकेदाराचा खून

0

रस्त्यात गाठुन धारदार चॉपरने वार : आरोपींच्या अटकेसाठी मयताच्या पित्याचा रास्ता रोको

जळगाव – शहरातील खेडी परिसरातील पेट्रोलपंपानजीक आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास रस्ता वापराप्रकरणी केलेल्या तक्रारीचा राग मनात ठेऊन एका बांधकाम ठेकेदारावर दोन ते तीन जणांनी चॉपरने सपासप वार करीत निघृण खून केल्याची घटना घडली. या घटनेमुळे खेडी परिसरात मोठी खळबळ उडाली असुन दोन महिन्यापुर्वी झालेल्या वादातुन हा खून झाल्याची माहिती मयताच्या नातेवाईकांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर पुतण्या मंथन मोरे याने दिलेल्या फिर्यादीवरून माहिती अशी की, विपीन मोरे हे व्यवसायाने बांधकाम ठेकेदार असुन ते खेडी येथील ज्ञानदेव नगरात राहतात. याच परिसरातील अमोल सोनवणे हा देखिल राहतो. दि. ९ डिसेंबर २०१८ रोजी रस्ता वापराच्या कारणावरून अमोल सोनवणे याने काका विपीन मोरे यांना शिवीगाळ व मारहाण केली होती. यासंदर्भात काकू चेतना मोरे यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून अमोल सोनवणे (मराठे) याने काका विपीन मोरे यांना तुला पाहुन घेईन अशी वारंवार धमकी दिली. आठ दिवसापुर्वी देखिल त्याने काकांकडे पाहुन इशारे केले. आज सकाळी विपीन मोरे हे खेडी परिसरातील पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून दुचाकी क्र. एमएच-१९ डीएफ ५३८४ वरून येत असतांना अमोल सोनवणे व त्याच्या साथीदारांना त्यांना अडवुन त्यांच्यावर चॉपरने सपासप वार केले. काही क्षणातच विपीन मोरे हे जमीनीवर कोसळले. यावेळी पुतण्या मंथन मोरे हा तेथुन जात असतांना त्याला गर्दी दिसली. घटनास्थळी काका विपीन मोरे हे जखमी अवस्थेत त्याला दिसून आले. त्याने विपीन मोरे यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात नेले. मात्र याठिकाणी त्यांना मयत घोषित करण्यात आले.
संशयित खून करून रस्त्यावर नाचले
विपीन मोरे यांच्यावर वार करून अमोल सोनवणे हा त्याच्या साथीदारांसह चॉपरसहीत गर्दीतुन बाहेर रस्त्यावर आल्यानंतर नाचत होता. यावेळी नागरीकांनी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतली.
‘ये तो ट्रेलर है….पिच्चर तो अभी बाकी है’ची धमकी
गेल्या दोन दिवसांपुर्वी संशयितांनी विपीन मोरे यांना ‘ये तो ट्रेलर है….पिच्चर तो अभी बाकी है’ अशी धमकी दिली होती. या धमकीच्या दोन दिवसानंतरच विपीन मोरे यांना खेडी परिसरात रस्त्यात गाठुन त्यांचा खून करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
जिल्हा रूग्णालयासमोर पित्याचा अर्धनग्न होत रास्ता रोको
विपीन मोरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जागीच त्यांचा मृत्यु झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी रूग्णालयात मोठी गर्दी केली होती. तसेच जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. तसेच मयत विपीन मोरे यांचे वडील दिनकर मोरे यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयासमोरील रस्त्यावर अर्धनग्न होत आरोपीच्या अटकेसाठी रास्ता रोको केला.
तक्रारीकडे पोलीसांचे दुर्लक्ष
विपीन मोरे यांनी अमोल सोनवणे याच्याविरूध्द औद्योगिक पोलीस ठाण्यात तक्रार देखिल केली होती. मात्र पोलीसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. वेळीच तक्रारीची दखल घेतली गेली असती तर कदाचित आज विपीन मोरे यांच्यावर हल्ला झाला नसता. पोलीसांनी दुर्लक्ष केल्यामुळेच विपीन मोरे यांचा खून झाल्याचाही आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
संशयित फरार
विपीन मोरे यांच्यावर चॉपरने वार केल्यानंतर संशयित अमोल सोनवणे हा आनंद हरी पाटील याच्यासमवेत पांढर्‍या रंगाच्या गाडीवर बसुन भुसावळकडे फरार झाला. दरम्यान मंथन मोरे याने दिलेल्या फिर्यादीवरून अमोल नाना सोनवणे व आनंद हरी पाटील या दोघांविरूध्द औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.