जूनपुर्वी बियाणे विकल्यास गुन्हा दाखल होणार

0

उन्हाळी पेरणी न करण्याचे आवाहन

जळगाव – जिल्ह्यात जून महिन्यापुर्वी कापसाचे बियाणे विक्रीवर बंदी घालण्यात आली असुन या बियाण्यांची विक्री केल्यास संंबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकुर यांनी दिली.
जिल्ह्यातील पिक परीस्थीती आणि लागवडीसंदर्भात कृषी विभागाचे संचालकांनी आज परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार जिल्ह्यात दि. १५ मेपर्यंत कापसाचे बियाणे ठोक विक्रेत्यांकडे दाखल होणार आहे. त्यानंतर ते किरकोळ विक्रेत्यांकडे दिले जाणार आहे. एक जूननंतरच कापसाच्या बियाण्यांची विक्री करावयाची आहे. त्यापुर्वी बियाण्याची विक्री करण्यावर कृषी विभागाने बंदी घातली असुन विक्री झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यासाठी तालुकानिहाय बियाणे विक्रेत्यांच्या बैठका कृषी विभागातर्फे घेतल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकुर यांनी दिली.

जिल्ह्यासाठी २५ लाख पाकिटांची मागणी
जिल्ह्यात यंदा कापसाचा पेरा वाढणार आहे. त्यामुळे खते आणि बियाण्यांची कमतरता भासू नये म्हणून जिल्हा कृषी विभागातर्फे आधीच खते व बियाण्यांची तरतूद करून ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी २५ लाख पाकिटांची मागणी करण्यात आली असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

उन्हाळी पेरणी न करण्याचे आवाहन
जिल्ह्यात पहिल्या पावसाच्या आधीच धुळपेरणी केली जाते. जून महिन्यात थोडाफार पाऊस झाल्यानंतर मागील अनुभवानुसार पाऊस पुन्हा दडी मारतो आणि शेतकर्‍यावर दुबार पेरणीचे संकट ओढावते. तसेच यंदाही कापसावरील गुलाबी बोंडअळीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी ६५ मिमीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकुर यांनी केले.