जळगाव लोकसभा मतदारसंघात काट्याची लढत

0

मराठा समाजाचे प्राबल्य; गेली 30 वर्षे भाजपची आहे मजबूत पकड

भाजपा, राष्ट्रवादीचे शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

जळगाव (अमित महाबळ) उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात यंदा काट्याची लढत होऊ शकते. भाजपाकडून सलग दोन टर्म निवडून आलेले विद्यमान खासदार ए. टी. नाना पाटील यांना उमेदवारी मिळते की, ऐनवेळी दुसरे नाव पुढे केले जाते यावर सन्पेन्स आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना मैदानात उतरविले आहे. शिवसेनेचे स्थानिक नेते देखील या मतदारसंघाची जोरदार मागणी करीत होते मात्र ती मागणी आता मागे पडली आहे. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रत्येक पक्षाची महत्त्वाकांक्षा आणि स्थानिक प्राबल्य लक्षात घेता यंदाची निवडणूक म्हणजे काट्याची लढत असणार हे स्पष्ट आहे. मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघावर गेली 30 वर्षे भाजपाची मजबूत पकड राहिली आहे. 2007 मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. वसंतराव मोरे विजयी झाले होते. हा अपवाद वगळता उत्तमराव लक्ष्मणराव पाटील (1989) यांच्यापासून भाजपाची विजयी परंपरा कायम आहे. विद्यमान खासदार ए. टी. नाना पाटील हे 2009 व 2014 असे सलग दोन टर्म खासदार आहेत. मतदारसंघातील ग्रामपंचायत ते नगपालिका; प्रत्येक ठिकाणी पक्षाचे सदस्य आहेत. बूथरचनेचे जाळे भक्कमपणे विणले गेले आहे. त्यामुळे विरोधकांनी राष्ट्रीय नेता, सेलिब्रिटी किंवा क्रिकेटर जरी रिंगणात उतरविला तरी त्याला भाजपा पराभूत करेल, असा विश्‍वास जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना वाटत आहे.

भाजपाकडून विद्यमान खासदारांसह पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचेही नाव चर्चेत आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून ना.गिरीश महाजनांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अभियंता प्रकाश पाटील यांच्यासह काँग्रेसचे माजी नेते शांताराम सोनजी पाटील यांचीही नावे अचानक चर्चेत आली आहे. खा. पाटील यांना पक्षातील एका गटाचा मोठा विरोध आहे.शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी युतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, अशी जोरदार मागणी केली होती. या पक्षाकडून माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील हे प्रबळ दावेदार मानले जात होते मात्र युतीचा विषय मार्गी लागल्यानंतर शिवसेनेची दावेदारी आपोआप संपुष्टात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सुरुवातीला नाही म्हणणारे देवकर आता प्रचाराला लागले आहेत.

विधानसभेच्या चार मतदारसंघातून भाजपा उमेदवाराला प्रत्येकी एक लाखांपेक्षा अधिक मते

गेल्या वेळी मोदी लाट होती. त्यावर स्वार होत ए. टी. नाना निवडून आल्याचा दावा विरोधक करतात. भाजपाचे आ. सुरेश भोळे यांचे मत मात्र, वेगळे आहे. मोदी लाट कायम आहे म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने विरोधक एक होत आहेत. यंदाही जळगावमधून भाजपाचाच उमेदवार निवडून येईल, असा दावा ते करतात. जळगाव शहर मतदारसंघातून गेल्या वेळेप्रमाणे लीड मिळवून देणार असल्याचे ते सांगतात. 2014 मध्ये जळगाव शहर व जळगाव ग्रामीण, चाळीसगाव व पाचोरा विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी किमान 1 लाखांपेक्षा अधिक मते भाजपाच्या उमदेवाराला मिळाली आहेत.

विरोधकांना विजयासाठी भाजपाच्या बूथ रचनेला द्यावी लागेल मात

आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेला आहे. मात्र, गेल्या 30 वर्षात खासदार वसंतराव मोरे यांचा अपवाद वगळता या मतदारसंघातून काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. राष्ट्रवादीने यंदा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना संधी दिली आहे. देवकरांचा जळगाव शहर व ग्रामीण, धरणगाव पट्ट्यात चांगला प्रभाव आहे. एरंडोल व पारोळा या भागात त्यांना पक्षाच्या इतर नेत्यांची चांगली मदत होऊ शकते. चाळीसगाव व पाचोरा पट्ट्यात भाजपा विरोधकांकडून किती मदत मिळेल यावर देवकरांचे भवितव्य अवलंबून असेल. गेल्यावेळेप्रमाणे यंदा मोदी लाट नाही. थोडक्यात भाजपाविरोधात नाराजी आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला करून घ्यावा लागेल. तो कसा हे त्यांच्यावर अवलंबून आहे. शिवसेना तयारीत आहेच. जागा वाटप अद्याप जाहीर झालेले नाही. स्थानिक पातळीवरील नेते भाजपाशी जुळवून घेण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यामुळे ते निवडणुकीत भाजपाला मदत करतील याची शाश्‍वती नाही. विरोधक कोणी का असेल, त्यांना विजयासाठी जातीय व इतर समीकरणांसह भाजपाच्या बूथ रचनेला मात द्यावी लागेल. किमान मते गेल्या वेळी भाजपाला 86 हजार 692 (एरंडोल), तर राष्ट्रवादीला 37 हजार 706 (जळगाव ग्रामीण) मिळाली आहेत. गेल्या वेळी पहिल्या व दुसर्‍या क्रमांकाच्या उमेदवारांमध्ये असलेला मतांचा फरक तब्बल पावणेचार लाखांचा आहे. तो पार करणे हे प्रचंड आव्हानात्मक असणार आहे. हे भाजपा विरोधकांना दुर्लक्षून चालणार नाही.

आव्हाने अनेक असतील

जळगाव मतदारसंघात सुरळीत विमानसेवा, गिरणा नदीवर बलून बंधारे होणे, शेळगाव बॅरेज व पाडळसरे यासारखे जुने सिंचन प्रकल्प मार्गी लागणे, एमआडीसीत नवीन उद्योगांना चालना आणि रोजगार निर्मिती, सोलापूर-जळगाव रेल्वेमार्ग पूर्ण करणे, जळगाव महापालिका हद्दीतील महामार्गाचे चौपदरीकरण व समांतर रस्त्याचे काम, तसेच तरसोद ते फागणे, औरंगाबाद ते जळगाव, जळगाव ते चाळीसगाव आदी चौपदरी महामार्ग वेळेत पूर्ण होणे यासारखी आव्हाने आहेत. यापैकी काही योजनांच्या मंजुरीचा अथवा त्यांना निधी देण्यात आल्याच्या घोषणा वेळोवेळी झालेल्या आहेत. मात्र त्यावर अद्यापपर्यंत
अंमलबजावणी झालेली नाही. त्याचेही उत्तर मतदारांना द्यावे लागेल.

2014 मधील मतांचे चित्र

खा. ए. टी. नाना पाटील (भाजपा) : 6 लाख 47 हजार 773
डॉ. सतीश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) : 2 लाख 64 हजार 248
मतांचा फरक : 3 लाख 83 हजार 525,
इतर 18 उमेदवारांना मिळालेली मते : 75 हजार 43