भडगाव मतदान केंद्राध्यक्ष निलंबीत

0

निवडणूकीच्या कर्तव्यात कसुर केल्याने कारवाई

जळगाव – निवडणुकीच्या कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी भडगाव मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्ष यांना आज जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आदेशान्वये निलंबीत करण्यात आले. या कारवाईमुळे निवडणूक कर्मचार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाआधी केंद्राध्यक्षांना मॉकपोल घेण्याचे आदेश होते. या मॉकपोलमध्ये ५० मतदान करून ते बाद करण्यास सांगितले होते. मात्र भडगाव येथील मतदान केंद्रावर अजबच प्रकार घडला. भडगाव येथे मतदान केंद्र क्र. १०७ येथे केंद्राध्यक्ष म्हणून अमळनेर तालुक्यातील डांगर बु. येथील योगेश्‍वर माध्यमिक विद्यालयाचे सहायक शिक्षक उध्दवराव बाबुराव पाटील यांची नियुक्ती होती. केंद्राध्यक्ष उध्दवराव पाटील यांनी मॉकपोल झाल्यानंतर मतदान बाद न करता प्रत्यक्ष मतदानाला सुरवात केली. त्यामुळे मतदानाच्या नोंदवहीत ५३ मतांचा फरक आढळुन आला. मॉकपोल संदर्भात प्रशिक्षणावेळी आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र या निवडणुकीच्या कामाकडे गांभीर्याने न पाहता प्रशिक्षणात केलेल्या सुचनांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. याबाबत उध्दवराव पाटील यांनी कबुली देखिल दिली. दरम्यान उध्दवराव पाटील यांनी लोकप्रतिनीधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ चा भंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी मतदान केंद्राध्यक्ष उध्दवराव पाटील यांना जिल्हा निवडणुक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निलंबीत केले आहे. या कारवाईमुळे निवडणूक कर्मचार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

२२ लाखाच्या रोकडसह पाच किलो चांदी सुपूर्द
जिल्ह्यात निवडणुक काळात आर्थिक व्यवहारांवर निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाने करडी नजर ठेवली होती. निवडणूक काळात जळगाव मतदारसंघात ९ लाख ८० हजार व पाच किलो चांदी तपासणीदरम्यान भरारी पथकांनी जप्त केली होती. तसेच रावेर मतदारसंघात १३ लाख १४ हजार ८०० रूपये जप्त करण्यात आले होते. या जप्त करण्यात आलेल्या रकमांसंदर्भात जिल्हास्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात आली. चौकशीअंती जप्त करण्यात आलेल्या रकमा व पाच किला चांदी संबंधितांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती प्रशासकिय सुत्रांनी दिली.

मतदानाच्या दिवशी पाच ठिकाणी गुन्हे दाखल
जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी दि. २३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यादिवशी अमळनेर येथे तीन तर भुसावळ आणि जळगाव येथे प्रत्येकी एक असे एकुण पाच आचारसंहीता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. यात अमळनेर येथे उमेश सतीश सोनार, पठाण काशिफखान ईस्माईल, चेतन नामदेव मिस्तरी, निलेश धनराज चौधरी, सागर महेंद्र बडगुजर, मोहित विजय सोनवणे, मुकेश रमेश पारधी, भुसावळ येथे अमोल रामदास सुरवाडे, तर जळगाव येथे संदीप उर्फ शेंड्या बापू पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या सर्व गुन्ह्यांची संबंधित पोलीस ठाण्यामार्फत चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.