मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांचे आवाहन
जळगांव – महावितरणच्या सर्वांगिण प्रगतीसाठी प्रत्येकाने दैनंदिन कामकाज पुर्ण कार्यक्षमतेने व कौशल्यपुर्वक पार पाडावे. त्यासाठी गुणवंत कामगार पुरस्कार हा एक प्रेरणास्त्रोत आहे. पुरस्कार प्राप्त कर्मचार्यांची जबाबदारी आता अधिक वाढली आहे. त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून सहकारी कर्मचार्यांना योग्य नेतृत्व प्रदान करावे, असे आवाहन जळगांव परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले.
आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्याने महावितरण व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत कामगार मेळावा व पुरस्कार सोहळा १ मे, रोजी लघु प्रशिक्षण केंद्र, विद्युत भवन येथे पार पडला. याप्रसंगी उपस्थित कामगारांशी कुमठेकर यांनी संवाद साधला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सकाळी ७.३० वा. ध्वजारोहण मुख्य अभियंता यांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना कुमठेकर म्हणाले की, स्वतःच्या व कंपनीच्या विकासासाठी कर्मचार्यांनी नवतंत्रज्ञान वापराचे कौशल्य आत्मसात करावे. ग्राहकांना वीजजोडणी देताना मोबाईल अॅपचा वापर करावा, अशी सुचनाही त्यांनी दिली. या सोहळ्यास अधिक्षक अभियंता फारुख शेख, अधिक्षक अभियंता(पायाभूत आराखडा) चंद्रशेखर मानकर, सहाय्यक महाव्यवस्थापक धैर्यशिल गायकवाड, कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर, कार्यकारी अभियंता संजय तडवी, प्रा.शैलेश शिरसाठ, प्रा. डॉ. शरद अकोले, योगशिक्षक सागर साळी, दीपस्तंभचे संचालक संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जोगेंदर मोरे उत्कृष्ट कर्मचारी
महावितरणच्या प्रगतीसाठी अभिनव संकल्पना राबविणार्या कर्मचार्यासाठी जळगांव परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी स्व- निधीतून परिमंडळस्तरीय उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराची घोषणा केली आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रथम वर्षाचा पुरस्कार जोगेंदर शांताराम मोरे, सहाय्यक अनुदेशक यांना रोख रू.५०००/-, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र बहाल करण्यात आला.
७० कर्मचार्यांचाही गौरव
सन २०१८-१९ या वर्षात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल गुणवंत कामगार पुरस्कार सोहळयात गुणवंत तांत्रिक कामगार / विशेष कार्य पुरस्काराने महावितरणच्या धुळे, जळगाव व नंदुरबार मंडळातील तंत्रज्ञ, यंत्रचालक संवर्गातील कर्मचार्यांसह व क्रीडा, नाट्य व दैनंदिन कामातील विशेष कामगिरीबद्दल ७० कर्मचार्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्राने पुरस्कृत करण्यात आले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने प्रताप नारायण सपकाळ (महावितरण), पितांबर गोपाळ सरोदे (बॉश), कैलाश भोळे (सुप्रिम) यांना गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी महावितरण प्रशासनाच्या वतीने सर्व कामगार संघटना प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. कर्मचार्यांनी ‘माझे महावितरण, माझे योगदान’ या संकल्प फलकाद्वारे कंपनी हीताचे संकल्प घेतले.
प्रारंभी कामगार कल्याण केद्रप्रमुख मिलिंद पाटील यांनी कामगारांसाठी राबविण्यात येणार्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. निरोगी जीवनात योगाचे महत्व प्रात्यक्षिक स्वरूपात योगशिक्षक सागर साळी यांनी विशद केले. प्रा. डॉ. शरद अकोले यांनी जीवनात सकारात्मक दृष्टीकोन बाळगल्यास ताण-तणावापासुन मुक्ती मिळेल, असा संदेश दिला. प्रा.शैलेश शिरसाठ यांनी थॅलेसिमिया आजाराविषयी कर्मचार्यांमध्ये जागरूकता वाढविली. प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर यांनी केले. सुत्रसंचालन उच्चस्तर लिपिक मुकेश अहिरे तर आभार जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी मानले.