जळगाव कृउबासच्या सभापतींकडुन आर्थिक हितास बाधा

0

संचालकांची तक्रार : जिल्हाधिकार्‍यांकडे अविश्‍वास प्रस्ताव

जळगाव – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर हे संस्थेच्या आर्थिक हितास बाधा आणणारे निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोप करून त्यांच्याविरूध्द आज १७ पैकी १५ संचालकांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. दरम्यान निवडणूकीनंतर जळगावच्या राजकारणात या घडामोडींमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी मुदत संपूनही राजीनामा दिला नाही अशी तक्रार संचालकांनी आज जिल्हाधिकार्‍यांकडे अविश्‍वास प्रस्तावाद्वारे केली आहे. तसेच सभापती लक्ष्मण पाटील हे संचालकांना विश्‍वासात न घेता मनमानी पध्दतीने कारभार करीत आहे. सभापती हे संस्थेच्या आर्थिक हितास बाधा येईल असे निर्णय घेत असल्याचा आरोप संचालकांनी केला आहे. दरम्यान या कारणास्तव आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ पैकी १५ संचालकांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे सभापती लक्ष्मण पाटील यांच्याविरूध्द अविश्‍वास प्रस्ताव दाखल करून विशेष सभेची मागणी केली आहे. या अविश्‍वास ठरावावर संचालक अनिल भोळे, प्रभाकर पवार, प्रभाकर सोनवणे, विमलबाई भंगाळे, मनोहर पाटील, सुरेश पाटील, वसंत भालेराव, कैलास चौधरी, भरत बोरसे, प्रकाश नारखेडे, प्रशांत पाटील, शशीकांत बियाणी, नितीन बेहडे, यमुनाबाई सपकाळे, सिंधबाई पाटील, सरलाबाई पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे उपस्थित होते.
नेत्यांच्या शब्दाला मान नाही -संचालक
सभापती लक्ष्मण पाटील यांनी शिवसेना नेते सुरेशदादा जैन, ना. गुलाबराव पाटील, भाजपाचे मंत्री ना. गिरीश महाजन, आ. एकनाथराव खडसे, आ. राजूमामा भोळे, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या शब्दाला मान न देता कार्यकाळ संपूनही आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे आम्ही १५ संचालकांनी त्यांच्याविरूध्द अविश्‍वास प्रस्ताव दाखल करून सभेची मागणी केली असल्याचे संचालकांनी सांगितले.