मेहरुण तलावावर पक्षप्रेमींनी केली 37 जातींच्या पक्ष्यांची नोंद

0

मेहरूण तलावावर जागतिक स्थलांतरीत पक्षीदिनानिमित्त पक्षी निरीक्षण, गणना व प्लास्टिक विरोधी कार्यक्रम ; 19 जणांनी घेतला मोहिमेत सहभाग

जळगाव- पक्षीमित्र गाडगीळ दाम्पत्यांच्या वतीने 11 मे रोजी सकाळी जागतिक स्थलांतरीत पक्षीदिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मेहरुण तलावावर पक्षी निरिक्षण, गणना, प्लास्टिकचे घातक परिणाम आदी कार्यक्रम झाले. यात शहरातील 19 पक्षीमित्रांनी सहभाग नोंदवून केलेल्या पक्षी गणनेत 37 जातींच्या पक्षांची नोंद करण्यात आली आहे. नोंद झालेले पक्षी स्थानिक स्थलांतरीत असून विदेशी स्थलांतरीत पक्षी आढळले नसल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.

2006 पासून जगभरात, वर्षातून दोनदा स्थलांतरीत पक्षी दिन साजरा केला जातो. ऑक्टोबर महिन्याच्या आणि मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यामध्ये हा दिन साजरा करण्यात येतो. हा दिन साजरा करण्यासाठी दरवर्षी नवीन संकल्पना राबवण्यात येते. ह्या वर्षीचे ‘प्लास्टिकपासून पक्षी वाचवा’ असे घोषवाक्य होते, स्थलांतरीत पक्षांमध्ये मुख्यतः पाणथळ पक्षी मोठ्या प्रमाणावर असतात. समुद्र, नदी, तलाव, ह्या त्यांच्या महत्वाच्या अधिवासांना घेरणारा प्लास्टिक कचरा तसेच प्रचंड तापमानामुळे आटत चालेले जलस्त्रोत हे, ह्या पक्षांच्या अस्तित्वास अत्यंत धोकादायक ठरत आहे. ह्याच संकल्पनेवर आधारित निसर्ग मित्र तर्फे प्लास्टिक, पक्षी व एकूण प्राणीजगत ,पर्यावरणावर होणार्‍या घातक परिणामांची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.

मेहरुण तलावावर सर्व पक्षीमित्र जमले. त्यानुसार सकाळी 6.30 ते 8.00 यावेळेत पक्षी गणना करण्यात आली. जागतिक स्थलांतरीत पक्षी दिनानिमित्त, मेहरूण तलावावर राबवण्यात आलेल्या पक्षी निरीक्षण व पक्षी गणना या उपक्रमात हेमलता पाटील, वेदश्री पाटील, योगेश सोनार, नारायण सोनार, चेतन वाणी, सुमित माळी, सुधाकर माळी, सोमेश वाघ, धनश्री बागुल, गोकुळ इंगळे, मुकेश कुरील, कृष्णाकुरील, विलास बर्डे, चिन्मय बारुदवाले, रेवीन चौधरी, सुमेध सोनावणे यांनी सहभाग घेतला.

या पक्षांची झाली नोंद
पक्षी गणनेत 37 जातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. त्यांची एकूण संख्या 496 भरली. त्यापैकी, 11 जाती ह्या पाणथळ पक्षांच्या होत्या. या गणनेत प्रामुख्याने छोटा पाणकावळा ,गाय बगळा, छोटाबगळा, मध्यम बगळा, ढोकरी, हळदी-कुंकू बदक, वारकरी, टिबुकली, कंठेरी चिलखा, नदी सुरय, शेकाट्या, हे पाणथळ पक्षी त्याचबरोबर वृक्ष निवासी निळ्या शेपटीचा वेडा राघू या स्थलांतरीत पक्षाची नोंद झाली. नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ यांनी सर्वांचे आभार मानले.