सोबत गेलेल्या तिसर्या भावाकडून आरडाओरड ; जीवंत व्हावीत म्हणून दोघांना मीठाने झाकले
जळगाव- दुचाकीवरुन मेहरुण तलावावर फिरण्यासाठी गेलेल्या महंमद उमेर जकी अहमद वय 10 आणि अबूलैस जकी अहमद वय 16 रा. अक्सानगर ही दाघे भावंड मेहरुण तलावात बुडाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. लहा भाऊ उमेर बुडत असतांना मोठा भाऊ अबूलैस त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उतरला मात्र तो बुडाला. सोबत असलेला तिसरा भाऊ अनस जकी अहमद याने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी दोघांना बाहेर काढले व जिल्हा रुग्णालयात हलविले. दरम्यान व्हॉटस्अॅपवर फिरत असलेल्या संदेशानुसार दोघे वाचावीत, यासाठी नातेवाईकांनी दोघा भावंडांना जिल्हा रुग्णालयात संपूर्णपण मीठाने झाकून ठेवले आहे. आई वडीलांच्या आशेपोटी हा प्रकार केल्याची माहिती मिळाली आहे.
भावाला वाचवायला गेला अन् दुसराही बुडाला
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अनस जकी अहमद 15, महंमद उमेर व अबूलैस जकी अहमद हे तिघे भावंडे दुचाकीने फिरण्यासाठी मेहरुण तलावावर गेली. याठिकाणी उमेर हा पाण्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. लहान भाऊ बुडत असल्याचे पाहून मोठा अबूलैसही पाण्यात उतरला मात्र तोही उमेरसोबत खोल पाण्यात गेला व दोघेही बुडाले. काठावर असलेल्या अनसने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आवाज एैकून तलाव परिसरातील परवेज अख्तर, सबिरोद्दीन पिरजादे, बबलू पिरजादे या तिघांनी घटनास्थळाकडे धाव घेवून दोघा बुडालेल्या भावंडाना बाहेर काढले व तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. दोघांचे पश्चात आई, वडील असा परिवार आहे. वडील जामनेर तालुक्यातील पहूर पेठ जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत शिक्षक आहेत. माहिती मिळताच नातेवाईकांसह शिक्षकांनी जिल्हा रुग्णालयता गर्दी केली.
रात्रभर दोघांना मीठाने ठेवले झाकून
व्हॉटस्अपॅवर एक संदेश व्हायरल झाला आहे. या संदेशानुसार पाण्यात बुडाल्यानंतर 3 ते 4 तासापूर्वी बुडालेला व्यक्ती मिळाला तर व्यक्तीला रात्रभर उघडे करुन मीठामध्ये झाकून ठेवले तर ते जिवंत होतात. यानुसार नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मीठाच्या गोण्या मागविल्या. उमेर व अबूलैस या दोघांना शवविच्छेदन गृहात मीठाने झाकून ठेवण्यात आलेले आहे. अनेकांनी हा फेक मॅसेज असल्याचे सांगितल्यावर, आई वडीलांच्या आशेपोटी करत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.