जळगाव: महानगरपालिकेने जळगाव जिल्हा बँकेकडून १९९७ ते २००१ या कालावधीत कर्ज घेतले होते. या कर्जापोटी महानगरपालिका दर महिन्याला जिल्हा बँकेला १ कोटी रुपये भरत होती. डिसेंबर २०१९ पर्यंत रक्कम भरायची होती. मात्र उर्वरित चार महिन्यात भरण्याची रक्कम एकत्र भरून मनपाने जिल्हा बँकेच्या कर्जातून मुक्ती मिळविली आहे अशी माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली.
आज बुधवारी ७ रोजी महापलिका प्रशासनाने जिल्हा बँकेचे ४ कोटी ६९ लाख भरले, तसे पत्र जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांना आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी महापौर सीमा भोळे, जिल्हा बँकेचे डी.एम.जितेंद्र देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र पाटील, मनपाचे लेखाधिकारी संतोष वाहोळे, मनपा भाजपा गटनेते भगत बालानी यांच्यासह मनपा पदाधिकारी उपस्थित होते.