पराभवासह विविध विषयांवर होणार चिंतन
जळगाव – लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर जिल्हा राष्ट्रवादी सुन्नावस्थेत असल्याचे वृत्त ‘दै. जनशक्ति’ने प्रकाशित केल्यानंतर अखेर राष्ट्रवादीला जाग आली आहे. जिल्हा व महानगर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपुर्ण बैठक उद्या दि. ३१ रोजी दुपारी ३ वा. आकाशवाणी चौकातील पक्ष कार्यालयात आयोजीत करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाकडुन राष्ट्रवादीचा दणदणीत पराभव झाला. या पराभवानंतरही जिल्हा राष्ट्रवादीत कुठल्याही प्रकारची बैठक किंवा साधे चिंतनही करण्यात आले नव्हते. यासंदर्भात ‘ना चिंता, ना चिंतन, जिल्हा राष्ट्रवादी सुन्नावस्थेत’ या मथळ्याखाली ‘दै. जनशक्तिने’ दि. २८ रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताचे राजकीय वर्तुळातुन जोरदार स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीच्याच काही कार्यकर्त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे वृत्ताबद्दल ‘दै. जनशक्ति’ने वाचा फोडल्याबद्दल सुप्त भावना देखिल व्यक्त केल्या. दरम्यान या वृत्ताचे पडसाद थेट जिल्हा नेत्यांपर्यंत गेल्यानंतर जिल्हा राष्ट्रवादीला जाग आली. लोकसभा निवडणुकीतील पराभव यासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्या दि. ३१ रोजी जिल्हा व महानगरची महत्वपुर्ण बैठक दुपारी ३ वा. पक्ष कार्यालयात आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीसाठी आजी, माजी आमदार, माजी खासदार, सेलचे प्रमुख, महिला, युवती आघाडी, शहर आघाडी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बोलावण्यात आले आहे. तरी बैठकीला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील व महानगराध्यक्ष नामदेव चौधरी यांनी केले आहे.