‘ना चिंता, ना चिंतन’, जिल्हा राष्ट्रवादी सुन्नावस्थेत

0

बुथ रचना, संघटन नसल्यानेच पक्ष खिळखिळा

चेतन साखरे
जळगाव – ‘कार्यकर्त्यांनो खचून जाऊ नका, मी अजून हरलेलो नाही’ असे भावनिक आवाहन खा. शरद पवार यांनी करूनही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर कमालीची सुन्नावस्थेत आहे. ‘ना चिंता ना चिंतन’ असेच चित्र सध्या पक्षात दिसून येत आहे.
देशात लोकसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागले आहे. या निकालांनी विरोधी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अक्षरश: विचार करायला भाग पाडले आहे. निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी ‘निवडणूकीत हरलो असलो तरी ना उमेद झालो नाही’ अशी भावनिक पोस्ट केली होती. खासदार शरद पवार यांची ही पोस्ट राज्यातील संपुर्ण कार्यकर्त्यांसाठी एक संदेश देणारी होती. तो म्हणजे ‘रडायच नाय लढायचं’. मात्र जळगाव जिल्ह्यात ही पोस्ट फारशी गांभीर्याने घेण्यात आलेली दिसत नाही.

पराभवाबाबत सर्वांचेच मौन
लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघातुन भाजपाचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांचा ४ लाख ११ हजारापेक्षा अधिकचे मताधिक्क्य घेत दणदणीत पराभव केला. या निवडणूकीत भाजपाच्या विजयाबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. नेहमीप्रमाणे इव्हीएम मशिनवर देखिल संशय व्यक्त केला गेला. पराभवाचे खापर पुन्हा एकदा इव्हीएमवर फोडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आहे. दरम्यान निकालानंतर पराभवाबाबत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मौनव्रत धारण केल्याचे दिसून येत आहे.

बुथ रचना, संघटनाचा अभाव
जिल्हा परीषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि आता लोकसभा या सर्वच निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सपाटून मार खाल्ला. प्रत्येक निवडणूकांमध्ये पराभव होऊनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्याचे कुठलेही सोयरेसुतकं दिसत नाही. या पराभवाची कारणे शोधण्यासाठी कुठलीही चिंता किंवा चिंतनही अद्यापपर्यंत करण्यात आले नाही. निव्वळ विरोधकांवर टिका करून निवडणूका जिंकता येत नाही. निवडणूका जिंकण्यासाठी संघटनाही मजबुत असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बुथ रचना आणि संघटन नसल्यानेच पराभवाचे तोंड सातत्याने पहावे लागले आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पाच वर्ष निवडणुकांचीच तयारी करीत असतो. याउलट मात्र राष्ट्रवादीचे आहे. हंगाम आला की राष्ट्रवादीचा कार्यकर्ता बाहेर पडतो. अशातच या पक्षात कार्यकर्ते हे स्वयंभू नेते असल्यानेही पक्षाची अनेकवेळा पंचाईत होते. संघटना हा पक्षाचा आत्मा आहे. गावागावातील मजबुत संघटनावरच विजयाचे गणित आखता येते. राष्ट्रवादीमध्ये नेमका याच गोष्टीचा अभाव असल्यानेही त्याचा फटका निवडणूकांमध्ये बसत आला आहे.

विधानसभेची चर्चाही नाही
भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या निकालानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरवात केली आहे. जिल्हा राष्ट्रवादी मात्र अद्याप पराभवाच्या विषयावरून सुन्न झाली आहे. विधानसभा निवडणूक लढविण्याबाबतही पक्षाच्या नेत्यांमध्ये विचार केला जात आहे. मात्र सामुहिक कुठल्याही प्रकारची चर्चा होतांना दिसत नाही.
पवारांची पोस्ट गांभीर्याने घेण्याची गरज
खा. शरद पवार यांनी केलेली भावनिक पोस्ट ही गांभीर्याने घेतली तर जिल्ह्यात राष्ट्रवादीला भवितव्य आहे. अन्यथा विधानसभा निवडणुकांमध्ये हा जिल्हा काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी मुक्त होईल.