उमेदवारीवरून गटबाजी : देवकर समर्थक व विरोधी गटाने घेतली प्रभारींची भेट
जळगाव – विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी दिसून आली. या मतदारसंघातुन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी उमेदवारीसाठी अर्जच केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली असुन अर्ज नसल्याने इतर आठ इच्छुकांमधुनच उमेदवार द्यावा अशी मागणी शिष्टमंडळाने जिल्ह्याचे प्रभारी आ. दिलीप वळसे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखतींची प्रक्रिया आज पक्ष कार्यालयात पार पडली. या मुलाखतींसाठी जिल्ह्याचे प्रभारी आमदार दिलीप वळसे पाटील, निरीक्षक करण खलाटे, रंगनाथ काळे, हे उपस्थित होते. दरम्यान जिल्ह्यातील ११ मतदारसंघासाठी मुलाखती घेण्यात आल्या. यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघातुन यापुर्वी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती. यावेळी मात्र त्यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे मागणी अर्जच भरला नसल्याची माहिती मिळाली आहे. पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार, रवी देशमुख, ज्ञानेश्वर महाजन, पुष्पाताई महाजन, अरविंद मानकरी, संदीप पवार, कल्पिता पाटील, कल्पना अहीरे या आठ जणांनी जळगाव ग्रामीणसाठी मुलाखती दिल्या. दरम्यान देवकरांना विरोध करून आठ जणांपैकी कुणालाही उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रभारी वळसे पाटील यांच्याकडे संजय पवार यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.
देवकर समर्थकांनीही घेतली प्रभारींची भेट
जळगाव ग्रामीण मतदारसंघातुन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी यापुर्वी दोन वेळा विधानसभा लढविली होती. त्यात एकदा ते जिंकले आणि दुसर्यांदा ते पराभूत झाले. आता पुन्हा देवकरांनाच उमेदवारी मिळावी म्हणून त्यांच्या समर्थकांनी आज सायंकाळी प्रभारी दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. आ. वळसे पाटील यांनी पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करावा लागेल असे देवकर यांच्या समर्थकांना सांगितले.
जळगाव ग्रामीण आणि जामनेरातुन सर्वाधिक अर्ज
विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव ग्रामीण आणि जामनेर मतदारसंघातुन सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
पक्षातील विरोधकांचा बंदोबस्त करावा
जळगाव ग्रामीण मतदारसंघातुन विधानसभेसाठी मी उमेदवारी अर्जच भरलेला नाही. त्याला अनेक कारणे आहेत. पक्षातच काही विरोधक आहे, जे समोरच्यांना मॅनेज होतात. त्यामुळे आधी पक्षातील विरोधकांचा बंदोबस्त करावा अशी विनंती प्रभारींकडे करण्यात आली आहे. पक्षाने मला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आग्रह केला आहे. मात्र जोपर्यंत विरोधकांचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. पक्षाने योग्य तो उमेदवार द्यावा.
गुलाबराव देवकर, माजी पालकमंत्री
ही कुठली पक्षशिस्त?
धरणगाव नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परीषद, जळगाव महापालिका याठिकाणी पक्षाचे अस्तित्व कुणामुळे शुन्य झाले आहे. आम्ही कधीही पक्षाशी गद्दारी केली नाही. पक्षाने ज्याच्याकडे नेतृत्व दिले त्यांनी पक्ष प्रायव्हेट लिमीटेड केला. पुढच्या काळात पक्ष प्रायव्हेट लिमीटेड होऊ नये ही अपेक्षा आहे. उमेदवारीसाठी पक्षाने अर्ज मागविले होते. एकीकडे अर्ज भरायचा नाही आणि दुसरीकडे शिष्टमंडळ नेऊन उमेदवारी मागायची ही कुठली पक्षशिस्त आहे? पक्षाने योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही आठही इच्छुक उमेदवारांनी केली आहे.
संजय पवार, जिल्हा बँक संचालक राष्ट्रवादी काँग्रेस
पार्लमेंटरी बोर्ड अंतीम निर्णय घेणार
विधानसभेसाठी पक्षाकडे प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जानुसार मुलाखतींची प्रक्रिया आज पार पडली. जिल्ह्यातील ११ जागांसाठी ५० जणांनी मुलाखती दिल्या आहे. मुलाखतींचा अहवाल राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्याची बैठक होऊन उमेदवारी अर्जाबाबत अंतीम निर्णय हा पार्लमेंटरी बोर्डच घेणार आहे. उमेदवारी देतांना मतदारसंघातील परीस्थीती, निवडुन येण्याची शक्यता, मतदारसंघातील सर्वे या गोष्टी उमेदवारी देतांना विचारात घेतल्या जाणार आहे. पक्षाकडे ज्यांनी उमेदवारी अर्ज केले आणि ज्यांनी केले नाही अशा सर्वांचा निर्णय हा पार्लमेंटरी बोर्डच घेणार असल्याचे जिल्ह्याचे प्रभारी आ. दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.