यशवंत नगरातील तरुणाला 40 हजाराचा गंडा

0

मदत करण्याच्या बहाण्याने केली फसवणूक ; सायबर पोलीस ठाण्यात तक्रार

जळगाव- नवीन एटीएम मिळाल्यानंतर बँकेत एटीएमकार्डचा पीन नंबर घेण्यासाठी बँकेत गेलेल्या यशवंत नगरातील तरुणाची स्टेट बँक चौकातील स्टेट बँकेत फसवणूक झाल्याची घटना 28 रोजी घडली. रांगेत मागे उभ्या इसमाने मदत करण्याच्या बहाण्याने पीन कार्ड व खात्यातील रक्कम जाणून घेत 40 हजार रुपयात फसवणूक केल्याचा अर्ज तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात दिला आहे.

रामानंदनगर परिसरातील यशवंत नगरात गौरव सोपान ठाकूर हे आई व लहान भावासोबत वास्तव्यास आहेत. वडीलांचे निधन झाल्याने कुटुंबांची जबाबदारी गौरव यांच्यावरच आहे. तो खाजगी ठिकाणी ऑफिसमध्ये काम करुन उदरनिर्वाह भागवितो. त्याचे स्वातंत्र्य चौकातील स्टेट बँकेत खाते असून याठिकाणी त्याने नवीन एटीएम कार्ड मिळावे म्हणून अर्ज केला. त्यानुसार 28 रोजी घरी नवीन एटीएम कार्ड आले. ते सुरु करण्यासाठी त्याच दिवशी गौरव त्याचा मित्र दर्शन चौधरी सोबत स्वातंत्र्य चौकातील स्टेट बँकेत गेला.

कॅशिअरने विचारणा न करताच देवून टाकले पैसे
गौरव चौकातील एटीएम मध्ये कार्ड अ‍ॅक्टीव करण्यासाठी दुपारी 11.15 वाजता गेलो. याठिकाणी एक जण गौरवच्या मागे रांगेत उभा होता. मदत करण्याच्या बहाण्याने त्याने पीन नंबर व गौरवच्या खात्यातील रक्कम जाणून घेतली. एटीएममधून बाहेर पडल्यावर मागे उभ्या व्यक्तीने तुझा कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करुन देतो म्हणून सांगितले. त्यावरुन गौरव त्याच्या सोबत बँकेत गेला, तेथे सोबतच्या व्यक्तीने कार्ड स्वॅप करुन मोबाईल नंबर व पिन नंबर टाकण्यास सांगितले. मात्र मशीनकडून तांत्रिक अडचण असल्याचा संदेश दिसत होतो व व्यवहार पूर्ण झाला नाही. असे दोन वेळा केल्यावर गौरव बँकेतून निघून गेला. 15 मिनिटांनी गौरवच्या मोबाईल 40 हजार रुपये रक्कम काढून घेतल्याचा संदेश आला. स्वॅप केलेल्या ठिकाणी कॅशिअरला विचारणा केली असता, त्याने तुमच्या सोबत असलेल्या व्यक्तीला 40 हजार दिल्याचे सांगितले. कुठलीच विचारणा न करताच पैसे का दिले असा संताप केल्यावर त्यांनी पोलिसात तक्रार देण्याचे सांगितले.

पोलिसांकडून तरुणाची फिरवाफिरव
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर गौरवने जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. तेथील कर्मचार्‍यांनी सायबर पोलीस ठाण्यात सांगितले. सायबरच्या कर्मचार्‍यांनी हा आमच्या अख्यातरीतील विषय नसून जिल्हापेठला तक्रार देण्यात आले. अशी दोनदा फिरवाफिरव झाल्यावर सायबर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले व यानंतर जिल्हापेठ पोलीसात तक्रार घेण्यात आली.