निवृत्त पोलिस अधिकार्‍याच्या घरी मोलकरीणीची हातसफाई

0

कपाटातून 48 हजाराची रोकड लांबविली ः पोलिसांकडून महिलेला अटक

जळगाव – रामानंदनगर पोलीस ठाण्यातून सेवानिवृत्त झालेले पोलीस उपनिरिक्षक भगवान विश्राम पाटील वय 59 रा.मुक्ताईनगर यांच्या घरातील मोलकरणीनेच हातसफाई दाखवून घरातून 48 हजाराची रोकड लांबविल्याची घटना 10 रोजी घडली. विशेष म्हणजे भगवान पाटील व त्यांची पत्नी यावेळी घरात होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कल्पना विकास मिस्तरी (सुतार, वय 30, रा.राजमालतीनगर) हिस ताब्यात घेतले आहे.

पोलिस उपनिरीक्षक भगवान विश्राम पाटील यांच्या घरी कल्पना मिस्तरी ही मोलकरीण म्हणून काम करते. शनिवारी सकाळी 11 वाजता पाटील हे गॅलरीत मोबाईलवर बोलत होते. तर त्यांची पत्नी बाथरुमध्ये कपडे धुत होती. यावेळी मोलकरीण कल्पना हीने दोघांची नजर चुकवून घर पुसत असतांना बेडरुममध्ये गेली. बेडरुममधील शोकेसमधील चावी घेतली व तिच्या सहाय्याने ड्रावरमधील एक लाख 18 हजाराच्या रोकडपैकी 48 हजार रुपयांची रोकड काढून घेतली. तर उर्वरीत 70 हजार रुपये ठेवून दिले. दिले होते. 

मोलकरीणीने चाबीही सोबत नेली
यानंतर कल्पना ही शोकेसची चावी सोबत घेऊन गेली होती. सायंकाळी सहा वाजता पाटील यांना पैशांचे काम असल्याने शोकेस उघडण्यासाठी चावीचा शोध घेतला. परंतू चावी मिळाली नाही. यामुळे त्यांनी स्कू्र ड्रायव्हर व हातोडीने लॉकर उघडले. ड्रावर मधुन 48 हजार रुपये लांबविल्याचे लक्षात आले. मोलकरीण कल्पना हिनेच पैसे चोरल्याचा संशय पाटील यांनी व्यक्त करत तिच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी कल्पना हिला अटक केली आहे. जितेंद्र सुरवाडे तपास करीत आहेत.