दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी बंद घरातून सव्वा लाखांचे दागिणे लांबविले

0

हरेश्‍वर नगरातील घटना ; पळून जाणार्‍या तिघांना घरातील महिलेने बघितले ; उकाड्यामुळे कुटुंबिय झोपले होते खालचे घर बंद करुन गच्चीवर

जळगाव- दुचाकीवरुन आलेल्या फेटे बांधलेल्या दोघांसह एका चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून 1 लाख 26 हजार रूपयांचे सोन्या चांदीचे दागिणे लांबविल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास समोर आली आहे. दरवाजाचा आवाज आल्यानंतर जाग आल्याने घरातील महिलेने घरातून तीन जणांना दुचाकीवरुन पळून जातांना बघितले, त्यात दोन जणांचे डोक्यावर पगडी होती या वर्णनानुसार पोलीस त्यांच शोध घेत आहे. दरम्यान जिल्हापेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरात चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, स्नेहा नितीन हरिव्यासी ह्या वृंदावन अपार्टमेंट, हरेश्वर कॉलनी येथे आई मधुबेन व मुलगा धय यांच्यासह वास्तव्यास आहेत. त्यांच पती गुजरात राज्यातील बडोदा येथे खाजगी कंपनीत नोकरीला असून त्याचठिकाणी राहतात. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त त्यांच्या घरी बडोद्याची बहिण नम्रता व तिचे दोन मुले आलेले आहे. 13 रोजी रात्री जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी गच्चीवर गेले.

दोघांची पगडी, एकाने घातला होता पिवळा शर्ट
पहाटे 3 वाजेच्या सुमारास स्नेहा यांना कुलुप तोडण्याचा आवाज आला. त्यावेळी त्यांनी या आवाजाकडे दुर्लक्ष केले. पुन्हा 3.30 वाजता तसाच आवाज आल्यानंतर त्यांनी बहिणीला सांगितले. खात्री करण्यासाठी इमारतीवरून खाली डोकावून पाहिले असता त्यांना दोन जणांच्या डोक्यावर पगडी तर एक पिवळा शर्ट घातलेला असे तीन जण घरातून बाहेर पडून दुचाकीवरुन पळून जातांना दिसले. स्नेहा यांनी तत्काळ जिल्हापेठ पोलिसांना प्रकार कळविला. तत्काळ जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी आले. यानंतर स्नेहा व इतर दोघी महिला खाली घरात आल्या. भितीने तोपर्यंत कुणीही खाली उतरले नाही. पोलीस आल्यावर घरात तपासणी केली असता, बेडरुमधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता.

बहिणीच्याही दागिण्यांवर डल्ला
चार ते पाच दिवसांपूर्वी आलेल्या बहिणीनेही स्नेहा यांच्या बेडरुमधील कपाटातच तिचे दागिणे ठेवले होते. त्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. यात 20 हजार रूपयांचे 8 ग्रॅम सोने, 15 हजार रूपयांचे 6 ग्रॅम कानातले सोन्याचे टॅप्स, 10 हजार रूपयांचे 4 ग्रॅम सोन्याचे कानातले टॅप्स, 10 हजार रूपयांचे 4 ग्रॅम सोन्याचे कानातले टॅप्स, 7 हजार 500 रूपयांचे 25 ग्रॅम चांदी, 3 हजार रूपयाचे दोन ग्रॅम कानातले टॅप्स असे नम्रता हिचे तर 20 हजार रूपयांचे 8 ग्रॅम सोन्याची चैन, 7 हजार 500 रूपयांचे 3 ग्रॅमची अंगठी, 7 हजार 500 रूपयांचे 3 ग्रॅमचे पेंडल, 5 हजार रूपयांचे दोन ग्रॅम पेंडल, 7 हजार 500 रूपयांचे 3 ग्रॅमचे पेंडल, 5 हजार रूपयांचे 2 ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, 5 हजार रूपयांचे 2 ग्रॅमचे सोन्याचे पेंडल आणि 3 हजार रूपये किंमतीचे चांदीची वाटी आणि चमचा असे स्नेहा हरिव्यासी यांचे असा एकूण 1 लाख 26 हजार रूपयांचा मुद्देमाल लांबविला. याप्रकरणी स्नेहा हरव्यासी यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.