धावत्या रेल्वेतून माल लांबविणार्‍या आंतराज्यीय टोळीचा जळगाव रेल्वे सुरक्षा बलाकडून पर्दाफाश

0

जळगाव- धावत्या रेल्वेतून चढून माल असलेल्या डब्याच्या खिडकीतून अथवा त्या डब्याचा पत्रा कापून प्रवेश केल्यावर साथीदाराच्या सहाय्याने कपडे, बेंटेक्सचे दागिण्यांसह जीवनाश्यक वस्तुंचा व्यापार्‍यांचा माल लांबविणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा जळगाव रेल्वे सुरक्षा बलाने पर्दाफाश केला. कपड्याचा 8 लाखांचा माल लांबविल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी जळगाव स्थानकावर उतरलेल्या मोहम्मद ईम्तियास असी वय 20 रा. यांच्यासह त्याच्या माध्यमातून त्याचा साथीदार मोहम्मद मिन्नत अली या झारखंडच्या संशयितांना रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली आहे. रेल्वे न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबई येथील व्यापार्‍यांचा लांबविला 8 लाखांचा माल
मुंबई येथील व्यापारी विकासकुमार पंडीत यांनी मुंबई- हावडा या गाडीमध्ये 8 लाखांचा कपड्याचा माल हावडा तसेच धनवत या गावांमधील व्यापार्‍यांसाठी पाठविला होता. मात्र प्रत्यक्षात हावडा येथील व्यापार्‍यांना त्यांचा माल न मिळाल्याने त्यांनी मुंबई येथील पंडीत यांना फोनवरुन प्रकार कळवून मालाचे पेमेंट देण्यास नकार दिला होता. त्यानंतर पंडीत यांनी मुंबई-हावडा एक्सप्रेसमधून अज्ञात चोरट्यांनी 8 लाखांचा कपड्यांचा माल लांबविल्याप्रकरणी मुंबई येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या विभागात तक्रार केली होती.

अशी टोळीची चोरीची पध्दत
मोठ मोठ्या शहरांमध्ये व्यापारी मुंबई येथील व्यापार्‍यांकडून कपडे, तसेच जीवनाश्यक वस्तू अशा माल मागवित असता. त्यानुसार मुंबई येथील माल एक्सप्रेसमध्ये पार्सल डब्यात माल पाठवितात. याची पक्की खबर आंतरराज्यीय टोळीला असते. त्यानुसार मुंबई स्थानकावरुनच टोळी कामाला लागते. ज्या गाडीमधून मोठ्या किंमतीचा माल जाणार असतो, त्या माहितीनुसार चोरटा त्या रेल्वेत बसतो. धावत्या एक्स्प्रेसमध्येच तो डब्यांमधून पार्सलच्या रेल्वेच्या डब्यापर्यंत पोहचतो. याठिकाणी बाथरुमच्या खिडकीतून अथवा शक्य न झाल्यास दुसर्‍या डब्यातून पार्सल असलेल्या डब्यात शिरण्यासाठी पत्रा कापण्यात येतो. एक मनुष्य आत शिरेल एवढा पत्रा कापला की, संबधित चोरटा पार्सलच्या डब्यात शिरतो. त्याठिकाणी मालाची तपासणी केली, कपडे, यासह बेंटेक्स, बॅग, पर्स, अशा विक्री करण्यायोग्य वस्तू तो दुसर्‍या डब्यातील साथीदाराकडे देतो, साथीदार एक एक वस्तू त्याच्याकडे असलेल्या झोल्यामध्ये भरतो. तो झोला शिवून झाला. ज्या ठिकाणी उतरुन मालाची सहज विल्हेवाट लावता येईल अशा ठिकाणी सर्व जण वेगवेगळ्या डब्यातून संबंधित रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणेचा अंदाज घेवून उतरतात. अशा पध्दतीने टोळी माल लांबविण्याची मोहिम फत्ते करते.

जळगाव रेल्वे सुरक्षा बलाच्या जाळ्यात अडकले
मुंबई येथील पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ए.के. दुबे, सहाय्यक रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त दिलीप चौकीकर यांनी ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकार्‍यांसह जवानांना सुचना केल्या होत्या. त्यानुसार जळगाव रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरिक्षक महेंद्र पाल यांनी पोलीस उपनिरिक्षक एस.व्ही.पाटील, जवान प्रमोद सांगळे, हरिंदर पाल, नितीन सोनवणे, मेहमूद शेख यांचे पथक तयार केले होते. पथक सर्व गाड्यांवर तसेच संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवून होते. मुंबई हावडा एक्स्प्रेसमधून एकजण 20 मोठ मोठ्या गोण्यासह जळगाव रेल्वे स्थानकावर उतरला. त्याची हालचाली संशयास्पद वाटल्याने आधीच माहितीनुसार सर्तक जवानांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता मोहम्मद ईम्तीहास अली वय 20 रा. झारखंड असे त्याने नाव सांगितले. त्याला खाक्या दाखवताच त्याने कबूली दिली. त्याच्याकडून कपडे तसेच बेंटेंक्सच्या महागड्या ज्वेलरी असलेला 8 लाखांचा माल जप्त करण्यात आला. ईम्तियाज पोलिसांच्या हाती लागल्याची भनक लागताच म्होरक्यासह त्याचे इतर पाच ते सहा साथीदार फरार झाले होते.

दुसर्‍या साथीदाराला बिहारमधून अटक
ईम्तियाज चौकशी त्याने त्याच्या इतर साथीदारांबाबत माहिती दिली. त्यानुसार जळगाव रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. यानुसार घटनेती संशयित मोहम्मद मिन्नत अली हा बिहारमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरिक्षक महेंद्र पाल यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक एस.व्ही.पाटील, प्रमोद सांगळे, नितीन सोनवणे, मेहमूद शेख, हरिंदर पाल यांच्या पथकाने बिहार गाठले. याठिकाणी तेथील पोलिसांच्या मदतीने पथकाने शनिवारी मोहम्मद मिन्नत अली याच्या बिहार राज्यातील साकेतगाव येथून मुसक्या आवळल्या. त्याला रविवारी भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यात घटनेत म्होरक्यासह तीन ते चार जण फरार असून त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.

रेल्वेच्या सर्व मार्गांवर 8 ते 12 टोळ्या कार्यरत
पश्‍चिम रेल्वे, मध्य रेल्वेसह विविध रेल्वे मार्गावर 8 ते 12 टोळ्या कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. यातील म्होरक्या एकच असून तो प्रत्येक वेळी नवीन मार्गावर नवीन तरुणांना एकत्र करुन चोरीचा कट रचतो. व मोहिम फत्ते करतो. एका ठिकाणी मोहिम फत्ते झाली की, दुसर्‍या रेल्वे मार्गाकडे संशयित वळतात. त्यामुळे अशाप्रकारे राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून म्होरक्या शोधात सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. या म्होरक्याच्या शोधात दिवस रात्र यंत्रणा कामाला लागली असून लवकरच त्याच्या मुसक्या आवळण्यात येतील, असा विश्‍वास पोलीस निरिक्षक महेंद्र पाल यांनी व्यक्त केला.