मर्चन्ट नेव्हीतील मुलासह पित्याला मारहाण करुन लुटले

0

जळगाव शिरसोली रस्त्यावरील घटना

जळगाव : जैन व्हॅली शिरसोली येथील कामकाज आटोपून दुचाकीने जळगावकडे येत असताना हॉटेल आमंत्रणजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरील मर्चन्ट नेव्हीत कार्यरत मनीषकुमार चंद्रेश्वरप्रसाद सिंह (26) हे प्रज्ञा कॉलनी यांच्यासह त्यांच्या वडीलांना मारहाण तसेच दमदाटी करुन मोबाईलसह 5600 रुपयांची रोकड असा 15 हजार 600 रुपयांचा एैवज लुटल्याची घटना मंगळवारी रात्री 9 वाजता घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

मनीषकुमार चंद्रेश्वरप्रसाद सिंह (26) हे प्रज्ञा कॉलनी जुनी जैन पाईप कंपनी याठिकाणी वडील चंदेश्वरप्रसाद सिंह, आई शिला यांच्यासह वास्तव्यास आहेत. मनिषकुमार हे मर्चट नेव्ही मुंबई येथे कार्यरत आहेत. सुटी असल्याने ते जळगाव येथे आले आहेत. दि. 02 रोजी सायंकाळी मनीषकुमार वडीलांसाबेत कामानिमित्त (एम.एच. 19 जी. 8442) ने दुचाकीने जैन व्हॅली येथे गेले होते.

दुचाकीची चाबी घेत भामटे झाले पसार
काम आटोपल्यानंतर ते घराकडे निघाले असता रात्री नऊ वाजेच्या सुमारास जळगाव शिरसोली रोडवरील हॉटेल आमंत्रणजवळ दोन इसमांनी हात देऊन थांबविले. का थांबविले असे विचारले असता एकाने मनीषकुमार यांच्या दुचाकीची चाबी काढुन घेतली. तर दुसर्‍या त्याच्या साथीदाराने मनीषकुमारच्या कानशिलात देत खिशात जे असेल ते लवकर काढा, असा दम भरला. एका संशयिताने मनीषकुमार यांच्या शर्टाच्या खिशातील 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरीने काढुन घेतला. तर वडिल चंद्रेश्वरप्रसाद सिंह यांच्या खिशातील 5 हजार 600 रूपयांची रोकड असे एकूण सुमारे 15 हजार 600 घेऊन दोघे संशयीत पसार झाले. याप्रकरणी शुक्रवारी फिर्याद दिल्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.