जिल्ह्यात धुमाकूळ घालणार्‍या अट्टल घरफोड्यांच्या आवळल्या मुसक्या

0

दै. जनशक्तिची दखल ; डॉ. पंजाबराव उगले यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव – गेल्या दोन महिन्यांपासून चोरट्यांनी शहरासह जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. एक दिवसाआड चोरीची घटना होत असल्याने दै.जनशक्तिने कोरी जागा सोडून जिल्हा पोलीस दलाचा अनोख्या पध्दतीने निषेध नोंदविला होता. जिल्हा पोलीस दलातर्फे याची गंभीर दखल घेण्यात येवून धुमाकूळ घालणार्‍या शहरातील विविध ठिकाणांहून चार अट्टल घरफोड्यांच्या मुकस्या आवळल्या आहेत, सोनुसिंग जगदिशसिंग बावरी वय 21 रा. शिरसोली नाका, जळगाव, प्रविण रणछोड पाटील वय 28 रा. बिडगाव ता.चोपडा, राजेंद्र उर्फ सोपराजा दत्तात्रय गुरव वय 30 रा.वाघनगर, हल्ली मुकाम. परेदशी पुरा, इंदोर , अजय उर्फ शाहरुख हिरालाल पाटील वय 25 रा. नांद्रा, जि. जळगाव अशी अट्टल घरफोड्यांची नावे आहेत. या चोरट्यांनी जळगाव, एमआयडीसी, अमळनेर, चोपडा, धरणगाव अशा ठिकाणच्या घरफोड्यांची कबूली असून त्यांच्याकडून दागिण्यांसह एैवज हस्तगत करण्यात आला आहे. या संशयितांकडून मोठ्या प्रमाणावर घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी अवघ्या पाच तासात खूनातील संशयितांना अटक करणार्‍या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या निरिक्षकांसह कर्मचार्‍यांना रिवार्ड देण्यात येईल,

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयातील दालनात दुपारी 12 वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला डॉ. उगले यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी उपस्थित होते. घनशाम दिक्षीत यांच्या खुनाची घटना उघड झाल्यावर सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी जिल्हा रुग्णालयासमोर रास्तारोको करुन पोलीस प्रशासन हाय-हाय, डॉ. पंजाबराव उगले यांची बदली करा अशा घोषणा दिल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमिवर पोलीस दलाने केलेली कामगिरी समोर यावी, या उद्देशाने ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

अट्टल घरफोडे, कुठल्या घरफोडीची दिली कबूल

1 राजेंद्र उर्फ सोपराजा दत्तात्रय गुरव वय 30 रा. वाघनगर, अजय उर्फ शाहरुख हिरालाल पाटील वय 25 रा. नांद्रा ता.जळगाव दोन्ही ह.मु. परदेशी पुरा, इंदोर, या दोघांना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने 25 रोजी इंदोर, मध्यप्रदेश राज्यातून सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या दोघांनी शहरात घरफोड्या केल्याची कबूली दिली आहे. त्यांच्याकडून शहरातील बहुतांश घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.

2 अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल दोन घरफोडीच्या गुन्हयात स्थानिक गुन्ह शाखेने प्रविण रणछोड पाटील वय 28 रा.बिडगाव ता.चोपडा याला अटक केली होती. त्याने गुन्ह्यातील बीडी व सिगारेट असा 80 हजाराचा मुद्देमाल काढून दिला.

3 रामानंदनगर पोलीस ठाण्यातील घरफोडीच्या गुन्ह्यात पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखा व रामानंदनगर पोलीस स्टेशन यांनी एकत्रितरित्या घेराव घालून सोनुसिंग जगदिशसिंग बावरी वय 21 रा. शिरसोली नाका याला ताब्यात घेतले होते. त्याच्या घरातील फ्रीजमध्ये 227 ग्रॅम व 160 ग्रॅम तसेच चांदीचे 920 मिलीग्रॅम वजनाचे असे 7 लाख 40 हजार 598 रुपये किमतीचे दागिणे मिळून आले होते. यात एका गुन्ह्यात फिर्यादीने दागिणे ओळखल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हा रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात असून संबंधितांनी मुद्देमालाची पाहणी करुन खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे.

अतिक्रमणाबाबत महापालिकेच्या आयुक्तांशी भेट
शनिवारी चिकू विक्रेत्याला बेदम मारहाण झाल्यानंतर या घटनेचे दोन गटातील वादात रुपांतर झाले होते. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतल्याने यातील सात संशयितांना शनिपेठ पोलिसांनी मध्यरात्रीच अटक केली. यापूर्वी अशा अनेक घडल्या आहेत. अतिक्रमणामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचत असून याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आले असल्याचेही यावेळी डॉ. पंजाबराव उगले यांनी सांगितले. त्याचप्रमाणे महापालिकेला हवा तेवढा बंदोबस्त देण्यात येवून लवकरच अतिक्रमणावर कारवाई करणार असल्याचेही संकेतही त्यांनी यावेळी दिले. यावेळी शहरातील तसेच काही जिल्ह्यातील वाहतुकीस अडथळा आणणार्‍या ठिकाणांबाबत माहिती देवून त्याही मार्गी लावण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाभरातील गुन्हेगारांची यादी तयार
गेल्या काही दिवसांपूर्वी आरएफआयडी ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती. यात काही कर्मचार्‍यांनी शक्कल लढविली होती. नावालाच गस्ती घातली होत कालांतराने ती बंद झाली, या योजनेसह गुन्हेगार दत्तक योजनेचीही पुन्हा अंमलबजावणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच एका शीटमध्ये महिन्यानुसार प्रत्येक कर्मचार्‍यांना वेगवेगळी ड्युटी लावण्यात येणार आहे. त्याची सरप्राईज भेट देवून अधिकारी खात्री करणार असून पालन करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यानिहाय गुन्हेगार तसेच गँगची यादी तयार करण्यात आली आहे. गुन्हे दत्तक योजनेनुसार एक पोलीस ठाण्याचा व एक एलसीबीचा कर्मचारी अशा दोघांना एक गुन्हेगार दत्तक देण्यात येणार आहे. तसेच महिन्यातील प्रत्येक शनिवारी आरोपींची ओळखपरेड करण्यात येणार असल्याचेही डॉ. पंजाबराव उगले यांनी दिली.

दै. जनशक्ति’ने केला होता पोलीसांचा निषेध
गेल्या अडीच महिन्यात शहरात 52 घरफोडीच्या घटना घडल्या. वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या निषेधार्थ 21 रोजी अंकात दैनिक जनशक्ति ने बातमीची जागा चक्क कोरी सोडून अनोख्या पध्दतीने निषेध नोंदविला होता. जनशक्तिच्या या निषेधाची अधिकारी, कर्मचार्‍यांसह नागरिकांमध्ये एकच चर्चा झाली होती. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, तसेच स्थानिक गुन्हे शाखेला संशयितांना अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार चार जणांना अटक करण्यात आली आहे.