पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर मेडीकल फोडले

0

स्वातंत्र्य चौकातील घटना ; शटरचे कुलूप तोडून 25 हजाराची रोकड लांबविली ; पोलिसांच्या गस्तीवर प्रश्‍नचिन्ह?

जळगाव- स्वातंत्र्य चौकातील बंद शिवम मेडीकलचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी काऊंटरमधील 25 हजाराची रोकड लांबविल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. शहरात चोरीचे सत्र सुरु असून एक दिवसाआड चोरीची घटना समोर येत आहे. यात विशेष म्हणजे स्वातंत्र्य चौकात पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर चोरी करुन चोरट्यांनी पोलीस अधीकार्‍यांसह कर्मचार्‍यांना आव्हान दिले आहे.

टेलीफोन नगरातील प्लॉट नं 9, दत्त मंदिराजवळ मुक्ताई धनाई बिल्डींगमध्ये नितीन भरत पाटील हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचे स्वातंत्र्य चौकातील मोहिते ब्लिडींगमध्ये दुकान नं 3 प्लॉट नं 399 येथे शिवम नावाचे मेडीकल आहे. त्यावर ते उदरनिर्वाह भागवितात. सकाळी 9 वाजेच्या सुमारास मेडीकल उघून रात्री 9.30 वाजता बंद करतात. 20 रोजी रात्री नेहमीप्रमाणे नितीन पाटील हे मेडीकल बंद घरुन घरी निघून गेले.

शेजारच्या दुकानदारामुळे प्रकार उघडले
नितीन पाटील यांना 21 रोजी सकाळी 9.30 वाजता शेजारील दुकानदार सिध्दार्थ रायमडे यांचा फोन आला. शटरचे कुलूप तुटलेले तर शटर अर्धवट उघडे असल्याचे त्यांनी सांगितले. यानुसार नितीन पाटील हे भरत पाटील व मेव्हण्यांसह घटनास्थळी मेडीकल आले. याठिकाणी मेडीकलमध्ये प्रवेश केला असता, काऊंटर लॉक तुटलेले तर त्यामधील 25 हजाराची रोकड गायब असल्याचे दिसून आले. चोरीची खात्री झाल्यावर त्यांनी वडीलांसह जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या गस्तीवर प्रश्‍नचिन्ह?
स्वातंत्र्य चौकातून चार वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते जातात. यारस्त्यावरुन दिवस रात्र वाहनधारकांची वर्दळ असते. वर्दळीच्या रस्त्यावरील तसेच विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरील मेडीकल फोडल्याने पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.