सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी निवेदन
जळगाव – जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेली पिके आज शिवसेनेने अप्पर जिल्हाधिकार्यांकडे सादर केली. दरम्यान यावेळी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सहा लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शेतकर्याचे अक्षरश: कंबरडेच मोडले आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावुन घेतल्याने अश्रुंचे पाट वाहत आहे. आज जळगाव तालुक्यातील शिवसेनेने नुकसान झालेली पिके घेऊन चक्क जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. याठिकाणी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली ही पिके अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांना सादर केली. यावेळी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. बेडसे यांना जिल्ह्यातील शेतकर्यांना हेक्टरी २५ हजार रूपये मदत द्यावी अशी मागणी केली.
अशा आहेत इतर मागण्या
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना तात्काळ मदत द्यावी, नुकसानीचे वैयक्तीक स्तरावर पंचनामे न करता सामुहिक पंचनामे करावे, सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकर्यांचे पीककर्ज माफ करावे, वीज बील माफ करावे, शेतकर्यांना हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जळगाव तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, सचिन चौधरी, नंदलाल पाटील, संजय सोनवणे, रामचंद्र पाटील, रमेश पाटील, जनार्दन कोळी, नरेंद्र सोनवणे, दिलीप जगताप, रावसाहेब पाटील, जितेंद्र पाटील, कमलाकर पाटील, संजय रूपचंद पाटील, अॅड. दिपक वाघ, पंढरी पाटील, मनोहर पाटील, शामकांत पाटील, नीलेश वाघ, रविंद्र पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकर्याला तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे. काळजीवाहु सरकारने हेक्टरी २५ हजार रूपये मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यात सत्तास्थापनेचा तिढा लवकर सुटला पाहिजे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा अशी शिवसैनिकांची इच्छा आहे.
गुलाबराव वाघ
जिल्हाप्रमुख, जळगाव