पुण्याला मुलाकडे गणपतीदर्शनासाठी गेलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकाचे घर फोडले

0

शिक्षकवाडीत मागचा दरवाजा तोडून चोरी ; दादावाडी परिसरातही दोन घरे फोडली

जळगाव- पुण्याला मुलाकडे गणपतीदर्शनासाठी गेलेल्या सेवानिवृत्त प्रा. अशोक जनार्दन चौधरी रा. शिक्षकवाडी, रिंगरोड यांचे घर फोडल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. चोरट्यांनी थेट मागचा दरवाजा तोडूनच घरात प्रवेश करुन एैवज लांबविल्याची माहिती समोर आली आहे. तर दादावाडी परिसरातही चोरट्यांनी बंद घरे लक्ष्य करुन एैवज लांबविला आहे. यातील रिंगरोडच्या घटनेत दाम्पत्यांने बाहेरगावी जाण्यापूर्वी दागिणे व रोकड कपाटात न ठेवतात कपाटाच्या खाली एका पेटीत ठेवण्याची शक्कल लढविल्याने ते सुरक्षित राहिले आहेत.

रिंगरोड परिसरातील शिक्षवाडीत मु.जे. महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. अशोक जर्नादन चौधरी हे पत्नी वसुधा वास्तव्यास आहेत. त्याचे पियुष व अंकुश हे दोन्ही मुले पुणे येथे वास्तव्यास आहेत. 30 ऑगस्ट रोजी गणेशात्सवाच्या पार्श्‍वभूमिवर चौधरी दाम्पत्य हे पुणे येथील मुलाकडे गेले आहेत. त्यांचे शेजारच्यांना मंगळवारी त्यांच्या मागच्या दरवाजा तुटलेला दिसल्याने घरफोडीचा प्रकार उघड आला. शेजारच्यांनी तत्काळ चौधरी यांना फोनवरुन घटना कळविली. चौधरी यांनी त्यांचे जळगावातील व्याही यांना प्रकार कळवून घरी जाण्याचे सांगितले.

चोरटे खाली हात परतले दागिणे व रोकड वाचली

चौधरी यांचे व्याही आल्यावर त्यांनी पाहणी केली असता चोरट्यांनी फ्रीज, देव्हारे, बेड, तसेच कपाटे अशा सर्व वस्तूंमधील सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता. व्याहींनी पाहणीनंतर चौधरींना फोन केला. चौधरी दाम्पत्याने जाण्यापूर्वी त्यांची दागिणे व रोकड असलेली पेटी कपाटाच्या खाली एका कोपर्‍यात ठेवली होती. ती चोरट्यांच्या हाती लागली नाही, ती सुरक्षीत असल्याने चौधरींचे व्याही यांनी ताब्यात घेतली आहे. या घटनेत चोरट्यांना रिकामे हात परतावे लागले. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. व पाहणी केली. श्‍वान पथकासह ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.

आनंदकॉलनीतील दोन बंद घरे फोडली
आनंद कॉलनीत सुभद्राबाई चौधरी राहतात. त्याचे पती मधुकर लहानू चौधरी यांचे निधन झाले आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी सुभद्राबाई गणेश कॉलनीत राहणार्‍या मोठ्या मुलीकडे गेल्या होत्या. चोरट्यांनी त्यांचे घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन घरातून 5 हजाराची रोकड लांबविली. तर त्यांच्या शेजारी भगवान आनंदा हरणे यांचेही घर चोरट्यांनी फोडले आहे. ते बाहेरगावी असल्याने नेमका एैवज किती झाला ते कळू शकले नाही.